महाराष्ट्रसह 6 राज्यांच्या साऊथ झोनमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी ठरली पात्र
21 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार राष्ट्रीय धनुर्विद्या चॅम्पियनशिप स्पर्धा
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : धनुर्विद्येमध्ये यापूर्वी सुवर्णवेध घेतलेल्या सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिची सीबीएसई धनुर्विद्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पुणे बालेवाडी येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्रासह केरळ कर्नाटक गोवा तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या सहा राज्यांच्या साऊथ झोन मधून 14 वर्षांखालील वयोगटात 350 शाळांमधील 1200 स्पर्धकांमध्ये अक्सा शिरगावकर ने 5 वा क्रमांक पटकावत नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. 21 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे सीबीएसई नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. कणकवली येथील पोदार सीबीएसई इंटरनॅशनल स्कुलमध्ये शिकणाऱ्या अक्सा हिने दृष्टी आर्चरी अकॅडमी साताराचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही उज्वल कामगिरी केली आहे. सी एम इंटरनॅशनल शाळा एस के पी कॅम्पस बालेवाडी पुणे येथे झोनल राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा 11 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्र गोवा केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्रप्रदेश या सहा राज्यांतील 350 शाळांमधून एकूण 1 हजार 200 स्पर्धक सहभागी झाले होते. झोनल मधील राज्यस्तरीय स्पर्धेत पहिल्या 5 क्रमांक विजेत्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. अक्सा शिरगावकर हिने झोनल राज्यस्तरीय स्पर्धेत 5 वा क्रमांक पटकावत 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नॅशनल आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे. कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे शासकीय ठेकेदार मुद्स्सरनझर शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसहाय्यता महिला बचत गटाच्या संस्थापिका तन्वीर शिरगावकर यांची अक्सा ही सुकन्या असून तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.