ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांसाठी मुंबईत सोय
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला काही तासांचा अवधी राहिला असताना निकालापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग आला. महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आ. सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली.
उद्या निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीतील जिंकलेल्या सर्व आमदारांना एकत्रित पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर खासदार संजय राऊत यांनी ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांसाठी मुंबईत सोय करण्यात येणार असल्याचे सांगितलं. जागांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आमदारांची आणि छोट्या पक्षांची गरज भासणार असल्याने महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे.












