नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी aksa ची निवड
सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : सिंधुकन्या अक्सा मुद्स्सरनझर शिरगावकर हिने आंतरशालेय धनुर्विद्या विभागीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाची कामगिरी करत कांस्यपदक पटकावले आहे. कांस्यपदक विजेत्या अक्सा शिरगावकर ची 19 ऑक्टोबर रोजी नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातारा येथे संपन्न झालेल्या 14 वर्षांखालील वयोगटातील आंतरशालेय धनुर्विद्या स्पर्धेत सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली या पाच जिल्ह्यातील स्पर्धकांमध्ये अक्सा हिने तिसरा क्रमांक पटकावून कांस्यपदकाची कमाई केली. आंतरशालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्या स्पर्धकांना राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळते. आंतरशालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवत अक्सा शिरगावकर हिने नांदेड येथे 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत आपले नाव निश्चित केले. कणकवली तालुक्यातील कलमठ गावचे शासकीय ठेकेदार मुद्स्सरनझर तैय्यब शिरगावकर आणि न्यू खुशबू स्वयंसह्ययता महिला बचत गटाच्या संस्थापिका तन्वीर यांची अक्सा ही सुकन्या आहे. यापूर्वी सीबीएसई आर्चरी चॅम्पियनशिप च्या साऊथ झोनमधील सहा राज्यांतून एक हजार दोनशे स्पर्धकांतून टॉप फाईव्ह मध्ये पाचव्या क्रमांकावर स्थान मिळवत अक्सा हिने राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेतही आपले स्थान पक्के केले आहे.तसेच आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या 13 वर्षांखालील वयोगटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत अक्सा हिने सुवर्णपदक पटकावून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. सातारा येथील दृष्टी आर्चरी अकॅडमी चे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे अक्सा हिला मार्गदर्शन लाभले आहे. अक्सा हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.