कनेडी हायस्कूलच्या श्रेया महाडीकची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

सलग चौथ्या वर्षी कनेडी हायस्कूलची राष्ट्रीय स्तरावर झेप

कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व क्रीडा परिषद यांच्या वतीने दिनांक १३ ते १४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय शालेय कॅरम आंबोली सैनिक स्कूल ता. सावंतवाडी येथे संपन्न झाली. या स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, तुकाराम शिवराम सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील विद्यार्थिनी कु. श्रेया राजेंद्र महाडीक (इ. १०वी) हिने उत्कृष्ट कॅरम खेळाचे प्रदर्शन करत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पाचवा क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली. तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये ती आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. गेली तीन वर्षे सुद्धा याच प्रशालेच्या कु. दिक्षा चव्हाण हिने राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करण्याचा पराक्रम केला होता.

श्रेयाने पहिल्या फेरीत अमरावतीच्या समीक्षा जामनिक हिचा २१-८, २१-११ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. दुसऱ्या फेरीत तिने पुण्याच्या बलाढ्य संजना लाड हिच्यावर अत्यंत संघर्षमय लढतीत २१-२०, १८-२१, १७-१५ असा निसटता विजय मिळवला. तिसऱ्या फेरीत तिने मुंबईच्या शरयू साळवे हिचा २१-१३, २१-८ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र उपांत्यपूर्व फेरीत तिला मुंबईच्या तगड्या आर्या घाणेकर हिच्याकडून १७-२२, २१-१८, १४-२१ असा निसटता स्वीकारावा लागला. त्यामुळे तिला या स्पर्धेत पाचव्या मानांकनावर समाधान मानावे लागले.

क.ग.शि.प्र. मंडळ, मुंबईचे विद्यमान संचालक सतीश सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन आर्. एच्. सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्रेयाचे अभिनंदन केले आणि राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी तिला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कु‌. श्रेया हिला प्रशालेतील संस्कृत तथा इंग्रजी अध्यापक आणि कॅरम प्रशिक्षक मकरंद आपटे, क्रीडा शिक्षक बयाजी बुराण, जिल्ह्यातील ख्यातनाम कॅरम खेळाडू गौतम यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!