४ जानेवारी,२०२५ रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान
खारेपाटण (प्रतिनिधी) : आयुष्यभर रस्त्यावरील निराधार आणि वंचित असलेले वयोवृध्द,मनोरूग्ण बांधवांच्या शारिरीक आणि मानसिक वेदनांवर मायेची फुंकर घालून त्यांना दिलासा देणारे तसेच निराधारांच्या पंखांना पुन्हा बळ देणारे व त्यांना आजारातून बरे करणारे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब यांना नुकताच पद्मश्री डाँ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार – २०२५ जाहिर झाला असून लवकरच दि.४ जानेवारी २०२५ या पुरस्काराचे वितरण पुणे येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. संदिप परब वय – ५१ यांनी त्यांचे आजवरचे सारे आयुष्य हे रस्त्यावरील निराधार वंचितांना माणूसकीचे सन्मान जन्य जीवन मिळण्यासाठी व्यतीत केले.तर मुंबईतील माणसांच्या गर्दीत रस्त्याकडेला निराधार आणि वंचित अवस्थेत कोणत्याही उपचारांविणा दिनवाने पडलेले निराधार,वयोवृध्द जख्मी,मनोरूग्ण बांधव पाहून संदिप परब या युवकाचे मन अस्वस्थ झाले. आणि या अस्वस्थतेतच त्यांनी हाती कोणतीही संसाधने नसताना सांताक्रुज मुंबई येथील वाकोला ब्रीजखालून जख्मी निराधार बांधवांवर प्रथमोपचार सेवा कार्य सुरू केले. या सर्व कार्याला जनतेचा पाठिंबा मिळाला.त्यातून जीवन आनंद संस्थेचे मुंबई,पालघर, सिंधुदुर्ग सह गोव्यातील आश्रमांचे सेवा कार्य उभे राहिले.आज या सर्व आश्रमांतून शेकडो निराधार बांधवांची सेवा सुश्रुषा श्री संदिप परब यांचे तरूण सहकारी करीत आहेत. श्री संदीप परब यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारामधे रोख एकावन्न हजार रूपये,मानपत्र,स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ आदींचा समावेश आहे.
संदिप परब यांना पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या नावाने दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाल्यामुळे जीवन आनंद संस्थेच्या सेवा कार्यकर्त्यांची टिम आश्रमांतील बांधव आणि हितचिंतक मंडळींमधे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तर संदीप परब यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे