खारेपाटण येथे जिल्हा पर्यटन माहिती केंद्र उभारणार- सुधीर सावंत
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्वाचा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे भव्य जिल्हा पर्यटन माहिती केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसेना नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी आज खारेपाटण येथे पक्ष कार्यालयाला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले. यावेळी संदेश पटेल, कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, महेश तेली, महेश राणे, खारेपाटण सरपंच प्राची इसवलकर, ग्रामपंचायत सदस्य गुरूप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, अस्ताली पवार, प्रणय गुरसाळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी यावेळी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयाला भेट दिली व कार्यकर्त्यांशी विकासकांबाबत चर्चा केली. यावेळी खारेपाटण सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने सुधीर सावंत यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. खारेपाटण घोडेपथर बंदर येथे सुरू असलेल्या संरक्षक भिंत कामाची देखील पाहणी त्यांनी यावेळी केली. तर खारेपाटण बंदरवाडी व काझीवाडी यांना जोडणारा ब्रीज कम बंधारा अर्थात जेटी बांधण्याच्या जागेची प्रत्यक्ष जाऊन पाहणी देखील सुधीर सावंत यांनी कार्यकर्त्यांसमवेत केली.
खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालयाला देखील सुधीर सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. सरपंच प्राची इसवलकर यांनी त्यांचे पुषपगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपसरपंच महेंद्र गुरव यांसह ग्रा.प. सदस्य जयदीप देसाई, किरण कर्ले, क्षितिजा धुमाळे, अमिषा गुरव, दक्षता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
खारेपाटण गाव हे ऐतीहासीक पार्श्वभूमी लाभलेले शहर असून खारेपाटण नवीन तालुका करणे याबरोबरच उद्योग व्यवसायला चालना देणारे लघु उद्योग सुरू करून युवकांना रोजगार देणे, महीला बचत गट एकत्रित करून विक्री केंद्र सुरू करणे, पर्यटनाला चालना देणारे व खारेपाटण चा विकास होणारे उद्योग व्यवसाय येथे सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील सुधीर सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिले.