खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून मान्यता मिळालेली कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्था चालक व शिक्षक यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली व संपूर्ण शाळेची पाहणी करून शाळेविषयी समाधान व्यक्त केले. यावेळी कट्टा पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव सुनील नाईक, सहसचिव येथील वराडकर हायस्कूलचे साबाजी गावडे, शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईक, सहा. शिक्षक महेश भाट, प्रकाश कानुरकर, समीर चांदरकर, संजय पेंदुरकर, भूषण गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जि.प.केंद्र शाळा खारेपाटण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी मान्यवरांचे स्वागत करून खारेपाटण केंद्र शाळेविषयी व सहशालेय उपक्रमाविषयी उपस्थित मान्यवरांना विस्तृतपणे माहिती दिली. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेच्या माता पालक संघाच्या उपाध्यक्षा प्रियंका गुरव, शिक्षण तज्ज्ञ मनोज करंदीकर, समिती सदस्या संध्या पोरे, खारेपाटण केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, अर्चना तळगावकर, शाळेच्या सहायक शिक्षिका रुपाली पारकर, अलका मोरे, रेखा लांघी आदी मान्यवर पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.
“ज्या शाळेत लोकांचा सहभाग जास्त प्रमाणात असतो अशा शाळा उंच शिखरावर जाऊन पोहचतात. खारेपाटण येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ ही त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे भावपूर्ण उदगार कट्टा शिक्षण संस्थेचे सचिव सुनील नाईक यांनी यावेळी काढले. वराडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय नाईक, संस्थेचे सहसचिव साबाजी गावडे यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली. तर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूलच्या वतीने खारेपाटण केंद्र शाळेला १५००/- रुपये रकमेची देणगी देण्यात आली.
खारेपाटण केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक श्री. राऊळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शाळेच्या सहाय्यक शिक्षिका रेखा लांघी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.