वैभववाडी (प्रतिनिधी) : लाकडी बांबूने वृद्धावर जीवघेणा हल्ला करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत पोबारा केला. पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर रा. नापणे धनगरवाडा असे या हल्ला झालेल्या वृद्धाचे नाव असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार सुरु आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नापणे धनगरवाडा येथे घडली.
नापणे धनगरवाडा येथे रस्त्यालगत परशुराम प्रभुलकर यांचे घर आहे. शिमगोउत्सवासाठी ते आपल्या मुलाबरोबर गावी आले होते.त्यांचा मुलगा सोमवारी रात्री मुंबईला गेला. त्यामुळे ते घरी एकटेच होते. मंगळवारी सकाळी ते आपल्या अंगणात उभे होते. यावेळी या ठिकाणी एक अज्ञात इसम आला. त्याने बेसावध असलेल्या प्रभुलकर यांच्यावर बांबूने हल्ला करून त्यांच्या गळयातील सोन्याची चैन हिसकावून घेऊन तो पसार झाला.या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत होऊन मोठया प्रमाणात रक्त स्त्राव झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना कणकवली येथे हलविण्या आले आहे.
घटनेची माहिती मिळाताच वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधुरी आडुळकर, उद्धव साबळे, हरिश्चंद्र जायभाय, अभिजित तावडे यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. पोलीस त्या अज्ञात हल्लेखोर चोरट्याचा शोध घेत आहेत.











