सिक्युरिटीजच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात, बंद रस्त्यावरून अवजड वाहनांची बिनधास्त वाहतूक सुरु

रस्त्याची कामे पूर्ण झाली असल्याने ४५ दिवसाचा अवधी तातडीने कमी करून, वाहतूक पूर्ववत करावी. फोंडा – राधानगरी रस्त्यावरील प्रवासी, ग्रामस्थ व व्यावसायिकांची मागणी !

दोन्ही जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष द्या– सर्वांचा आग्रह!

फोंडाघाट (प्रतिनिधी) : १० मार्च २५ पासून बंद केलेल्या दाजीपूर- राधानगरी रस्त्यावर, रात्रीच्या अंधाऱ्या काळोखातून अवजड वाहतूक बिंधास सिक्युरिटीच्या सहकार्याने, गेल्या आठ-दहा दिवसात सुरू आहे. याकडे ना ठेकेदारांचा ना बांधकाम०- रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांचा वचक आहे. त्यामुळे यामध्ये आर्थिक देवाण-घेवाण होऊन, अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे राधानगरी- कोल्हापूर- निपाणी कडे होत असल्याचा संशय इतर वाहन चालक, व्यावसायिक, ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. किंबहुना रस्त्याचे डांबरीकरण- पॅचवर्क पूर्ण झाल्याने आणि फेजीवडे येथे डायव्हर्षन मुळे, वाहतूक सुरळीत असल्याने कोल्हापूरचे व सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी गांभीर्याने लक्ष देऊन फोंडा — घाट मार्गे दाजीपूर ,राधानगरी मार्ग तातडीने सर्व वाहने व एसटीसाठी सुरू करावा. आणि या मार्गावरील कर्ज काढून व्यवसाय उभारलेल्या हॉटेल, धाबे, खानावळ, चहा कॉफी टपरी आणि इतर व्यावसायिकांना तसेच एसटी प्रवासीही रुग्ण यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे .

वस्तुतः ठेकेदार कंपनीने दाजीपूर फोंडा लोरे तिठा येथे सिक्युरिटीज नेमून जड वाहतूक, एसटी वैभववाडी – गगनबावडा मार्गे तारीख १० मार्चपासून कलेक्टर आदेशाने गाड्या वळविल्या. त्यामुळे राधानगरी पासून फोंडाघाट येथे ये – जा करणारे व्यापारी- प्रवासी- रुग्ण- वृद्ध यांना प्रवास त्रासाचा होऊ लागला. दरम्यान राधानगरी ते दाजीपूर पर्यंत रस्ता डांबरीकरण करून पॅचवर्कने आठ दिवसात पूर्ण झाला असून, फक्त ते फेजीवडे येथील लहान पुलाचे बांधकाम कुर्म गतीने चालू आहे. या ठिकाणी डायव्हर्षन केल्यामुळे वाहतुकीस कोणताही त्रास अथवा अडथळा नाही. त्यामुळे या आठ दिवसात रात्रि दोन ते पाच पर्यंत जड ट्रक, ट्रॉलर्स ची वाहतुक सिक्युरिटीच्या आशीर्वादाने चालू आहे.मग फक्त एसटीच्याच प्रवाशांना आणि वाटेतील कष्ट करून हॉटेल – टपरी – धाबे व्यावसायिकावरचआणि प्रवाशी यांवर प्रशासनाचा अन्याय का ? असा संतप्त सवाल सर्वसामान्य प्रवासी, व्यावसायिक, वाहन चालक यांचे कडून विचारला जात आहे. की गगनबावडा घाटाची पुनरावृत्ती करण्याचा प्रशासनाचा घाट आहे ? असाही प्रश्न विचारला जात आहे…

तरी प्रशासनाने ४५ दिवसाचा अवधी कमी करून, त्वरित एसटी व अवघड अवजड वाहतूक सुरू करावी. अशी आग्रही मागणी होत आहे. अन्यथा पंधरा दिवसांनी वाहतूक पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशारा सर्वांकडून देण्यात आला आहे….

error: Content is protected !!