श्री देव मल्हारी मार्तंड जय मल्हार देखावा विशेष आकर्षण
मसूरे (प्रतिनिधी) : “श्री स्वामी समर्थ महाराज कि जय….., श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ……” या जयघोशात हडपिड येथील स्वामी समर्थ मठ येथे स्वामींचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भाविकांच्या दर्शन रांगा उन्हाची परवा न करता दुपारी देवालया बाहेर पोहोचल्याचे दिसून आल्या. दुपारी पालखी सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, तसेच अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. उत्सवा निमित्त गाभाऱ्यात फळांची व फुलांची लक्षवेधी आरास करण्यात आली होती. महा आरती नंतर फटाक्यांची जोरदार आताषबाजी करण्यात आली. पुणे जेजुरी गड कडेपठारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या येळकोट येळकोट जय मल्हार देखाव्याचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ मालिका फेम श्री स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते सकाळी झाले.
सकाळी सकाळी श्री गणेश पूजन, पादुकापूजन, अभिषेक, होमहवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, मल्हारी मार्तंड यांच्या देखाव्याचे अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते उद्घाटन,लघुरुद्र कुंकूमार्चन, दुपारी पालखी प्रदक्षिणा सोहळा, महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी गोंधळ, सुस्वर भजन, रात्री महाप्रसाद, त्यानंतर तुफानी विनोदी लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज आदी कार्यक्रम झाले. श्री स्वामी समर्थ मालिका फेम श्री स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधला. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पूरस्कार सन्मानित नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त खजिनदार ज्ञानेश्वर राऊत यांनी भाविक भक्तांचे आभार मानले.












