3 अपत्ये असताना शासकीय नोकरीसाठी शासनाची फसवणूक केल्याचा जयप्रकाश कदम यांचा आक्षेप
जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले निवेदन
कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील आचिर्णे ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी सविता काळे उर्फ सविता हांडे यांनी स्वतःला 3 अपत्ये असतानाही शासनाची फसवणूक करून ग्रामसेवक पदी नोकरी मिळवल्याचा आरोप करत सविता काळे यांची सोलापूर येथे झालेली आंतरजिल्हा बदली रद्द करावी आणि श्रीमती काळे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश कदम यांनी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 3 जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात जयप्रकाश कदम यांनी म्हटले आहे की सविता भीमराव काळे उर्फ सविता लक्ष्मण हांडे यांना स्वतःची 3 अपत्ये असतानाही त्यांनी 3 अपत्ये असल्याची बाब शासकीय ग्रामसेवक पदाची नोकरी मिळवताना शासनापासून लपवून ठेवली. याबाबतच्या तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे व गटविकास अधिकाऱ्यांकडे याआधी दाखल आहेत. असे असताना जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे यांनी रात्री 11 वाजता सविता काळे यांच्या आंतर जिल्हा बदली आदेशावर सही केली आहे.सविता काळे उर्फ सविता हांडे यांचे पती लक्ष्मण हांडे हे वैभववाडी पंचायत समिती मध्ये विस्तार अधिकारी पदी कार्यरत असून त्यांनी आपली पत्नी सविता काळे यांच्याबाबत दाखल तक्रार अर्जाबाबत माहिती तक्रारदारांना न देता तक्रार अर्ज आपल्याकडेच दडपून ठेवतात. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल तनपुरे यांनी सविता काळे यांच्या विरोधातील एक वर्ष प्रलंबित असलेली फाईल प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ना दाखवता वरिष्ठांना अंधारात ठेवून ग्रामपंचायत अधिकारी सविता काळे यांच्या सोलापूर येथे आंतरजिल्हा बदली आदेशावर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही घेतली आहे. या प्रकरणात उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी भ्रष्टाचार केल्याचे समजत आहे.तरी ग्रामपंचायत अधिकारी सविता काळे यांच्या सोलापूर येथे झालेल्या आंतरजिल्हा बदली ला स्थगिती देऊन 3 अपत्ये असतानाही शासकीय नोकरी मिळवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जयप्रकाश कदम यांनी केली आहे.











