बेकार युवक एकता संघटनेचा ४१वा वर्धापन दिन जोशात साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : बेकार युवक एकता संघटनेचा ४१ वा वर्धापन दिन नुकताच चिंचपोकली मुंबई येथे संघटनेचे कार्यकर्ते संतोष सोहनी व विवेक हडपी यांच्या प्रयत्नांतून धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीरंग पुजारे, मिलिंद गावडे, गितेश केळबाईकर, संजय पाटकर, पुरुषोत्तम पुजारे यांनी परिश्रम घेतले. सर्व जुन्या आणि आताच्या युवा तरुणांना एकत्र येण्यासाठी आवाहन केले आणि त्यास उत्तम प्रतिसादही मिळाला.

शनिवार दि. १ एप्रिल, २०२३ रोजी एका मैत्रीच्या धाग्यामध्ये बांधलेले सर्वजण एकत्र आले आणि हा ४१व्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमिलनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. मुंबईतील चाळ संस्कृतीच्या जमान्यात, गिरणी कामगारांच्या संपाच्या काळात चिंचपोकळी येथील भारतीय विद्या भवन क्र.४ जवळील (बावला बिल्डीग नं.४) मधील दुसऱ्या माळ्यावरील कुटुंबांत काही तरुण बेकार युवक होते. या बेकार युवकांनी असेच गप्पागोष्टी करत असता त्यांचे एक मंडळ स्थापन केले. मंडळाचे नाव सर्वानुमते अफलातून असे ‘बेकार युवक एकता संघटना’ ठेवण्यात आले. असे नाव ठेवण्याचे कारण त्यावेळी काही जण नोकरीवर होते तर काही जण बेकार होते. शिक्षित होते पण नोकरीच्या प्रतिक्षेत होते.

याच कालावधीत योगायोगाने बिल्डिंग समोर असलेल्या एका गोदामाच्या गच्चीवर उजव्या सोंडेच्या श्री गणेशाची मूर्ती कै. श्रीधर ब्रीद व श्री सुभाष ब्रीद यांना आढळली. यापेक्षा चांगला शुभ संकेत आपल्या कल्पनेला काय असू शकतो असा विचार करून या युवकांनी या शुभकार्याची सुरुवात श्री गणेश पूजनाने करण्याचे ठरवून दि. १ एप्रिल, १९८२ रोजी श्रींच्या मूर्तीची जिन्यावर एका छोट्या लाकडी मंदिरात प्रतिष्ठापना केली.

मुरलीधर पुजारे यांच्या अध्यक्षतेखाली विलास पाटकर, प्रकाश पाटकर, चंद्रकांत मार्गी, कृष्णा म्हसकर, राजेंद्र ब्रीद, रविंद्र ब्रीद, रंजन तिवरेकर, विलास तिवरेकर, दिलीप तिवरेकर, प्रफुल्ल नाईक, पद्माकर नाईक, मोहन राऊळ, प्रकाश राऊळ, उदय राऊळ, संजय शिर्के, विजय शिर्के, चंद्रकांत सोहनी, संजय सोहनी, विलास सोहनी, मधुकर सोहनी, बंडू तानावडे, जनार्दन पुजारे, प्रताप चव्हाण, दिपक सांडव यांनी मिळून बेकार युवक एकता संघटनेची स्थापन केली.

सुरुवातीला एक वाचनालय चालू करण्यात आले. काही सभासद स्वखर्चाने वर्तमान पत्र ठेवत होते. स्थानिक या वाचनालयाचा लाभ घेऊ लागले. तसेच दररोज भक्तीभावाने गणरायाचे पूजन होत होते. दर संकष्टी चतुर्थीला आरती होऊ लागली. काही दिवसांतच श्री गणेशाच्या आशिर्वादाने सर्व बेकारांना नोकऱ्या लागल्या आणि त्याही शासकीय. अशी या मंडळींची भावना आहे. श्री गणेश आपल्या नवसालाच पावले आणि त्या प्रती भक्ती अधिक दृढ होत गेली. म्हणता म्हणता मजल्यावरील इतरही तरुण या संघटनेत सामील झाले. दरवर्षी श्री गणेशोत्सव तर अतिशय थाटात, आनंदात साजरा होऊ लागला. अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री महाप्रसाद ठेवला जाई. कोकणात ज्याला पचखाजा म्हणतात. सुरुवातीच्या काळात मक्याच्या लाह्या, शेंगदाणे, काळे चणे, सुके खोबरे एकत्रित करून गुळाच्या पाकात मिश्रित महाप्रसाद असे. तेव्हापासून आजतागायत तीच परंपरा कायम आहे. दर संकष्टी चतुर्थीला आरती, श्री गणेश चतुर्थीला तर भव्य दिव्य स्वरूपात रोषणाई, श्री गणेश सध्या ज्या संगमरवरी मंदिरात स्थानापन्न आहेत, त्यास फुलांची मनमोहक आरास आणि महाप्रसादाला सर्वांना जेवण.

मागील एकेचाळीस वर्षात अनेक जण नोकरी निमित्ताने व राहण्यासाठी उपनगरामध्ये वास्तव्यास गेले. परंतु त्यांची नाळ आजही बावला बिल्डिंगशी जोडलेली आहे. अजूनही ते अधूनमधून आणि न चुकता महाप्रसादाच्या दिवशी रात्री बावला बिल्डिंगमध्ये येतात. त्यानिमित्ताने आपल्या सहकाऱ्यांची भेट होते. आता त्यातील काही सहकारी हयात नसले तरी त्यांचे स्मरण आवर्जून होते. सर्वांचा आपसातील स्नेह आणि दादरावरील श्री गणेशा प्रती श्रद्धा अजूनही दृढ आहे, कायम आहे. सध्या तिथे स्थायिक असणारे नारायण महाडेश्वर आणि मिलिंद गावडे श्री गणेशाची सेवा करत आहेत. संघटना सुवर्ण महोत्सवाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
यावेळी सर्व संस्थापक सदस्य, त्याकाळचे वाचनालयाचे सर्वात जुने एकमेव वाचक ज्येष्ठ भिकाजी मुरकर उभयतांचा, ज्येष्ठ सल्लागार बाळ पाटकर, इतर सहकारी डॉ. विजय शिर्के, रविंद्र हडपी, सुरेश हडपी तसेच सर्व कार्यरत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. महिलांचे हळदीकुंकू ठेवण्यात आले होते. बऱ्याच माहेरवाशिनिंची हजेरी लक्षणीय होती. काही संस्थापक सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

४१ वर्षे मागे फिरून पाहताना सर्व सवंगड्यांची आठवण तसेच आता हयात नसलेल्या सदस्यांचे स्मरण करताना डोळे भरून आले. कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला. सरते शेवटी सर्व जुन्या आठवणी ताज्या करत आपल्या डोळ्यात साठवत सर्व मार्गस्थ झाले एका ठाम विचाराने की, पुढील वर्षी १ एप्रिलला पुन्हा भेटूच नव्या उमेदीने आणि त्याच उत्साहाने. वर्धापन दिन साजरा करण्याचे त्यांनी ठरवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!