तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे येथे आरोग्य सेवा देणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऋचा कुलकर्णी यांना निरामय विकास केंद्र, कोलगाव यांच्याकडून चौदाव्या वर्धापनदिनी डॉ. शालिनी सबनीस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ “आरोग्यलक्ष्मी पुरस्कार” देवून गौरविण्यात आले आहे. यावेळी निरामय विकास केंद्रांचे सदस्य तसेच डॉ. शमीता बिरमोळे, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. गौरी गणपत्ये, डॉ. स्वार, डॉ. बलराज व डॉ. उज्वला येळकोटे, डॉ. चिंदक आदी उपस्थित होते.
तळेरे सारख्या छोट्या गावात १९९६ ला फारशा सुविधा नसताना आरोग्य सेवा चालू करून दोन पिढ्यांचे आरोग्यरक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार कृतज्ञता म्हणून देण्यात आला. यावेळी डॉ. ऋचा कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत प्रसाद घाणेकर यांनी घेतली. सत्काराला उत्तर देताना डॉ. ऋचा यांनी त्यांच्या MD ऍडमिशन वेळी भयानक मुंबई दंगल चालू असतानाही मुंबईत जाऊन त्यांनी एक महत्वाचे सर्टिफिकेट कसे मिळवले, त्याची चित्तथरारक गोष्ट सांगितली. त्यावेळी आई व जवळच्या तसेच अनोळखी लोकांनीही कसे साहाय्य केले याचे त्यांनी वर्णन केले.
ग्रामीण भागातच सेवा द्यायची म्हणून १९९६ ला तळेरे मध्ये आल्यावर सुरुवातीचा काळ खूप कठीण होता. त्यावेळी पती डॉ. मिलिंद यांची साथ लाभली. तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम व आपल्या मुलीचे संगोपन या द्विधेत माझ्या सासूबाई यांच्यामुळेच मी मार्ग काढू शकले म्हणून हा पुरस्कार मी माझ्या सासूबाईंना अर्पण करत आहे, असे त्या म्हणाल्या. त्याकाळी एचआयव्हीचे पेशन्ट प्रचंड प्रमाणात होते. त्यांना सेवा देताना आलेले अनुभव त्यांनी सांगितले. त्याकाळात पेशंटच्या संपर्कात असल्याने स्वतःलाही त्याची लागण व्हायची भीती वाटत असे व त्या दर सहा महिन्याला आपलीसुद्धा टेस्ट करून घेत पण सुदैवाने तसे काही झाले नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व साडी, श्रीफळ असे असून ट्रस्टी डॉ. अनघा सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.