खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान ईद सणाच्या निमित्ताने केंद्र शाळेतील संलग्न असलेल्या आजी – माजी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसहित पालकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषद केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पाटणकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्या समीक्षा शेट्ये, खारेपाटण केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, शाळेचे पदवीधर शिक्षक संजय राऊळ, शिक्षिका अर्चना तळगावकर, सहाय्यक शिक्षिका रुपाली पारकर, अलका मोरे आदी मान्यवर पदाधिकारी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.



खारेपाटण बंदरवाडी येथील मुस्लिम धर्मीय विद्यार्थी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा नं.१ येथे शिक्षण घेत असून शाळेच्या वतीने दरवर्षी ईद निमित्त मुस्लिम बांधवांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात येतात. यावेळी देखील शाळेतील मुस्लिम धर्मीय आजी – माजी विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांनी भेट देऊन त्यांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देत शुभेच्छा दिल्या. तर मुस्लिम बांधवांनी देखील शाळेतील शिक्षक व शाळा समिती पदाधिकारी यांचे स्वागत करत पाहुणचार व सन्मान केला. खारेपाटण येथील सामजिक कार्यकर्ते रफिक नाईक यांनी खारेपाटण केंद्र शाळेच्या या उपक्रमाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले.












