काणकोण येथे ३० एप्रिल रोजी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

परफेक्ट अकॅडेमी, केशव सेवा साधना गोवा यांचे संयुक्त आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये जेईई, नीट आणि इतर प्रवेश परीक्षांसाठी अग्रगण्य मानले जाणारी परफेक्ट अकॅडेमी, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी झटणारी केशव सेवा साधना, गोवा यांच्यावतीने घेतल्या गेलेल्या काणकोण टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, येत्या रविवारी ३० एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न होणार आहे. काणकोण टॅलेंट सर्च परीक्षा परफेक्ट अकॅडेमी आणि केशव सेवा साधना, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १० मार्च दरम्यान काणकोण येथे घेतली गेली. या परीक्षेला दक्षिण गोवावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १७०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. या परीक्षांतील प्रत्येक शाळेतून पंधरा ते वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळेत काणकोण येथील केशव सेवा साधना ट्रेनिंग सेंटर, तसेच परफेक्ट अकॅडेमी काणकोण येथे होणार आहे. सदर कार्यक्रमांमध्ये काणकोण तालुक्यातील १० माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांचा त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान होणार आहे. या परीक्षेसाठी केशव सेवा साधनाचे कार्यवाह, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा राज्याचे माजी संघचालक लक्ष्मण उर्फ नाना बेहेरे, टीजेएसबी बँकेचे गोवा कर्नाटकचे रिजनल मॅनेजर अरुण भट, तसेच सिंधुदुर्गचे सुपुत्र प्राध्यापक राजाराम महादेव परब यांची विशेष उपस्थिती असणार आहे.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना करिअर कसे घडवावे? याविषयी देखील तज्ज्ञ मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः कमी वयापासून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी.? यासंदर्भात सावंतवाडीचे प्रा. रुपेश पाटील यांचे व्याख्यान मुलांसाठी व पालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. परफेक्ट अकॅडेमीच्या गोवा राज्यातील तिसऱ्या आणि एकंदरीत १८ व्या शाखेचे उद्घाटन यानिमित्ताने रविवारी पार पडणार आहे. दक्षिण गोवा भागामध्ये प्रवेश परीक्षांची सुविधा सुरू करून देणे, हे यामागचे उद्दिष्ट आहे. यासाठी केशव सेवा साधनाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी प्रचंड मेहनत केली आहे, असे प्रा. राजाराम परब यांनी कळविले केले. परफेक्ट अकॅडेमीच्या गोवा येथे हरमल आणि पर्वरी येथे जेईई, आणि नीट कोचिंगला अगोदरच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

error: Content is protected !!