वैभववाडी (प्रतिनिधी) : चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील अनेक गावांची सभापती सिद्धेश रावराणे यांनी पाहणी केली. तिथवली, वेंगसर, मागवली, पुनर्वसन गावठण, कुसुर कुंभारी, सोनाळी आदि गावात जाऊन सभापती सिद्धेश रावराणे यांनी पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला.
यावेळी उपसभापती साची कोलते, पंचायत समिती सदस्य सुवर्णा संसारे, विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, संतोष टक्के, तालुका कृषी कृषी अधिकारी निरंजन देशमुख, संबंधित गावातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी व ग्रामस्थ उपस्थित होते.
गेले तीन दिवस तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. पावसाबरोबरच चक्रीवादळ झाल्याने तालुक्यातील विविध गावातील घरांचे व गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सभापती सिद्धेश रावराणे यांनी नुकसानग्रस्त भागाचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा केला. यावेळी नुकसानग्रस्त नागरिकांना धीर देत जास्तीत जास्त मदत शासनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना सभापती यांनी दिल्या आहेत.










