वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत झालेल्या चक्रीवादळासह अवकाळी पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांनी रविवारी संबंधित गावांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.
कोळपे जिल्हा परिषद प्रभागातील आखवणे भोम पुनर्वसन गावठाण, मांगवली, तिथवली, वेंगसर आदी गावांमध्ये जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला व नुकसानीची माहिती घेतली. अनेक ठिकाणी घरांची कौले व पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे . तसेच आंबा, काजू व इतर फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी निदर्शनास आले.
आखवणे भोम पुनर्वसन गावठाण परिसरात अनेक घरांचे छप्पर उडाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या नुकसानीची तातडीने शासन स्तरावर नोंद करून बाधितांना योग्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही प्रमोद रावराणे यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच संबंधित महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाने पंचनामे जलदगतीने पूर्ण करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी आखवणेचे माजी सरपंच आकाराम नागप, भाजपा तालुका उपाध्यक्ष अभय कांबळे तसेच स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते. गावागावांत जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रमोद रावराणे यांचे आभार मानले.
चक्रीवादळग्रस्त भागांची प्रमोद रावराणे यांच्याकडून पाहणी










