श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा व मंदार सांबारी कुटुंबीय, आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा व मंदार सांबारी कुटुंबीय, आचरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी दुपारी ठीक ३.३० वाजता संस्थेचे माजी अध्यक्ष कै.श्रीकांत रघुनाथ सांबारी यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ‘नमन नटवरा’ अर्थात ‘नाट्योत्सव २०२६’ हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. आपल्या आवडत्या नाटकातील कोणताही नाट्यप्रवेश ३ ते ५ मिनिटात वाचून सादर करायचा असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते. या नाट्योत्सव कार्यक्रमात आचरा पंचक्रोशीतील १२ नाट्यप्रेमींनी सहभाग दर्शविला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे, मंदार सांबारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मालवण शाखेचे कार्यवाह संजय शिंदे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी केले. संस्थेच्या सांस्कृतिक समिती सदस्या श्रद्धा महाजनी यांनी ‘देह मंदिर चित्त मंदिर’ ही प्रार्थना आपल्या सुस्वर आवाजात म्हटल्यानंतर बाबाजी भिसळे, अशोक कांबळी, संजय शिंदे, मंदार सांबारी, डॉ. सिद्धेश सकपाळ यांनी आपल्या सुस्वर आवाजात ‘पंचंतुंड नररुंड मालधर’ही नांदी म्हणून कार्यक्रमास छान रंगत आणली. नाट्यप्रवेश वाचनात कु.एंजल फर्नांडिस, कु.कावेरी परब, विष्णू पेडणेकर, योगेश मुणगेकर, सुरभी त्रिंबककर, कविश कावले, सुगंधा गुरव, प्रियांका सकपाळ, प्राजक्ता खोत, डॉ. सिद्धेश सकपाळ, संजय शिंदे आदी वाचकांनी सहभाग दर्शवून एकच प्याला, ती फुलराणी, नटसम्राट, अखेरचा सवाल, इथे ओशाळला मृत्यू, गेले भजनाक पोचके लग्नाक इ. नाटकातील नाट्यप्रवेश उत्कृष्टरित्या वाचून दाखवले. वाचनालये टिकावित आणि वाढावीत या सुरेश ठाकूर, संस्था आणि .मंदार सांबारी यांच्या संकल्पनेतून राजेश भिरवंडेकर, लक्ष्मी राणे, कृतिका आयर, कावेरी परब, मंगेश परब(वृत्तपत्रवाचक) या नियमित आदर्श वाचकांचा सन्मानपत्र, पुस्तकरूपी भेट आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. नियमित आदर्श वाचकातून लक्ष्मी राणे व राजेश भिरवंडेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेचे कार्यवाह संजय शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी देणगी देणारे सचिन गुळगुळे(उद्योजक) यांचाही श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष श्रीकांत सांबारी यांच्याबद्दल उपस्थितांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमास आचरा व आचरा पंचक्रोशीतील श्रीकांत सांबारी प्रेमी व वाचकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी केले तर सांस्कृतिक समिती सदस्या व नवनिर्वाचित जि. प. सदस्या वर्षा सांबारी यांनी आभार मानले.









