कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनि.कॉलेजमध्ये दहावी-बारावी परीक्षेच्या १०० टक्के निकालातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

कळसुली (प्रतिनिधी) : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, कळसुली प्रशालेत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (HSC) फेब्रु./मार्च २०२६ मधील १००% निकालाची परंपरा कायम राखणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शालेय समितीचे चेअरमन के. आर. दळवी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्यावेळी विशेष उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे बक्षिस व भेटवस्तू देवून कौतुक करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे सल्लागार प्रकाश दळवी, उद्योजक प्रदीप सावंत, स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन नामदेव घाडीगावकर, सदस्य रजनीकांत सावंत, जयवंत कुलकर्णी उर्फ भाई गुरुजी, बापू खरात, शिवाजी गुरव, राजू राऊत, मंगेश घाडीगावकर, संतोष तेली, मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे, पर्यवेक्षक एस. के. सावळ, शिवप्रसाद घाडीगावकर, कोमल राऊत, श्वेता दळवी, प्रियांका देसाई, आरती सावंत, नीता गुरव, प्रमोद दळवी, रघुनाथ मेस्त्री, संतोष गोसावी, विनायक दळवी इ. मान्यवर, पालक व ग्रामस्थ तसेच प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक व्ही. व्ही. वगरे यांनी प्रशालेतील विविध उपक्रमांची माहिती देत इ.८ वी व इ. ९वी साठी सुरू करण्यात आलेला बहुविध कौशल्य अभ्यासक्रम तसेच इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड याचबरोबर इ. ६ वी च्या वर्गाकरीता या वर्षी नव्याने चालू करण्यात आलेल्या शंकर महादेवन अकॅडमी, बेंगलोर यांच्यामार्फत Reach Out India – Music education in Village Schools अंतर्गत Grow With Music – school program – Vocal हा ऑनलाईन संगीत शिक्षण उपक्रम यांसारख्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा देतो असे म्हणत यासाठी बक्षीस देणाऱ्या व्यक्तींचे आभारही त्यांनी व्यक्त केले. त्यानंतर कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

यामध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेतील
प्रथम क्र. – भूषण प्रमोद दळवी, द्वितीय क्र.– कु. मेघा प्रविण दळवी, तृतीय क्र. – कु. मयुरेश सुरेश धुरी व तृतीय क्र– कु. वेदिका रघुनाथ मेस्त्री तसेच उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षा वाणिज्य शाखेतील प्रथम क्र. – कु. रसिका नंदन गांवकर, द्वितीय क्र.– कु. प्राची महेश देसाई, तृतीय क्र.– कु. सारथी सुनील भोगले त्याचप्रमाणे कला शाखेतील प्रथम क्र.– कु. निधी विजय पालव, द्वितीय क्र. – कु. मितीश विष्णू पाटकर, तृतीय क्र.– कु. प्रशांत प्रकाश कासले या विद्यार्थ्यांचा कळसुली शिक्षण संघ, मुंबई यांच्यावतीने वह्या, फोल्डर व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना भाई कुलकर्णी गुरुजी यांच्याकडून रु. ५०००/- त्याचप्रमाणे बापू खरात (माजी एपीआय) यांच्याकडून रु. ५०००/- बक्षिस स्वरूपात देण्यात आले. त्याचप्रमाणे इ. १० वी संस्कृत (संयुक्त) विषयांमध्ये प्रशालेतील तब्बल १२ विद्यार्थांनी पैकीच्या पैकी ५० गुण प्राप्त करत प्रशालेच्या यशामध्ये मानाचा तुरा खोवला अशा रिया तांबे, अक्षरा राणे, सृष्टी दळवी. तेजस्वी गुरव, आसावरी मोडक, वेदिका मेस्त्री, मेघा दळवी, श्रेयश दळवी, ऋद्र गुरव, भूषण दळवी, मयुरेश धुरी, स्वरूप गोसावी या विद्यार्थ्यांना अमर पवार यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली. याचप्रमाणे शिवाजी गुरव, शिवप्रसाद घाडीगावकर, नीता गुरव, कोमल राऊत आणि श्वेता दळवी यांनीही आर्थिक स्वरूपातील बक्षिसे देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला.

शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल संस्थेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी भाई कुलकर्णी गुरुजी, बापूसाहेब खरात आणि शिवाजी गुरव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यशाच्या शिखरावर पोहोचताना संस्कार जपावेत, आई-वडील, गुरुजन आणि आपल्या मातीतले ऋण कधीही विसरू नये, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. प्रमुख पाहुणे प्रकाश दळवी यांनी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. चांगली संगत माणसाचे आयुष्य घडवते आणि योग्य व्यक्तींचा सहवास यशस्वी वाटचालीस बळ देतो, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात के. आर. दळवी यांनी शंभर टक्के निकाल हा विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व हितचिंतक यांच्या एकजुटीचे फलित असल्याचे सांगितले. पुढेही ही यशाची परंपरा कायम राहील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विशेषतः शेतकरी व कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचे कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष – मा. सूर्यकांत राजाराम दळवी, कार्याध्यक्ष – मा. विजय पांडुरंग सावंत, सचिव – जय मारुती दळवी, माजी विद्यार्थी संघ – अध्यक्ष – भालचंद्र रघुनाथ दळवी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद सावंत यांनी केले.

error: Content is protected !!