ई स्टोअर च्या ठकसेनांचे धाबे दणाणले | मुंबईसह सिंधुदुर्गातील सात आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

3 कोटी 20 लाखहून अधिक रक्कमेचा अपहार

अटकेची टांगती तलवार ; सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ माजवलेल्या ई स्टोअर कंपनीद्वारे आर्थिक गुंतवणूक करून घेऊन फसविणाऱ्या ठकसेनांना कोर्टाने दणका दिला असून या ठकसेनांचे धाबे दणाणले आहेत. ई स्टोअर मधील वेदिक आयुकेअर कंपनी च्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेवीदारांचे 3 कोटी 20 लाख हून अधिक रक्कम ठकवणाऱ्या मुंबईसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7 आरोपींचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा न्यायाधीश वर्ग 1 श्री. एस.टी. त्रिपाठी यांनी नामंजूर केला. या गुन्ह्यात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. फिर्यादी चैतन्या तारकर यांनी देवगड पोलीस ठाण्यात 13 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या फिर्यादी दिली होती. प्राथमिक तपासात 54 गुंतवणूकदारांच्या एकूण 26 लाख 14 हजार रुपयांचा अपहार झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र सिंधुदुर्ग आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अधिक तपास केला असता एकूण 478 गुंतवणूकदारांची 3 कोटी 20 लाख 61 हजार 699 रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. या गुन्ह्यातील आरोपी अनिल काशीराम जाधव ( रा.कामोठे, नवी मुंबई ), संजना संजय परांजपे ( डोंबिवली वेस्ट कल्याण ठाणे ) शैलेंद्र बाबुराव पेडणेकर ( रा मळगाव, ता. सावंतवाडी ) ,रौनक अली पटेल ( रा. शिवाजीनगर कणकवली ) ,सचिन सदाशिव सावंत ( रा. कणकवली ) किरण उर्फ मधुकर कदम ( रा नारूर, कदमवाडी, ता. कुडाळ ), देविदास बाळकृष्ण परब ( रा. गोगटे मराठे कॉम्प्लेक्स, देवगड ) यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. यावर सुनावणीवेळी अटकपूर्व जामीन अर्जाला हरकत घेताना सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायाधीशांच्या निदर्शनास आणले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेदिक आयुकेयर हेल्थ अँड रिटेल प्रा. लि. आणि ऑक्सीस ई कॉर्प सोल्युशन प्रा. लि. या कंपन्यांमार्फत झालेल्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपी क्रमांक ५ अनिल काशिराम जाधव यांच्याविरोधात तपास यंत्रणेने न्यायालयात गंभीर मुद्दे मांडले आहेत. या प्रकरणात ४७८ गुंतवणूकदारांची तब्बल ३ कोटी २० लाख ६१ हजार ६९९ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, वेदिक आयुकेयर हेल्थ अँड रिटेल प्रा. लि. आणि ऑक्सीस ई कॉर्प सोल्युशन प्रा. लि. या कंपन्या रिझर्व्ह बँकेकडे नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) म्हणून नोंदणीकृत नसतानाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यात आल्या. विविध आमिषे आणि परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंध संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ आणि ४(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यासाठी आरोपी अनिल जाधव यांचा ताबा आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.

तपासात असेही समोर आले आहे की, संबंधित कंपन्यांचा कारभार २०११ नंतर बंद होत असल्याची माहिती असतानाही गुंतवणूकदारांना सेमिनारच्या माध्यमातून कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यामुळे गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

बँक व्यवहारांच्या प्राथमिक तपासात अनिल जाधव यांच्या HDFC बँक खात्यातून संबंधित कंपन्यांच्या खात्यांमध्ये सुमारे २७ लाख रुपये जमा झाल्याचे दिसून आले आहे. तसेच कंपन्यांच्या खात्यांतून जाधव यांच्या खात्यात ४३ लाख ५१ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. इतर बँकांमधील व्यवहारांचा आकडा कोट्यवधी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता तपास यंत्रणेने व्यक्त केली आहे.

याशिवाय आरोपी क्रमांक १० गोपाळ मधुकर कदम यांनी जाधव यांच्या खात्यात २८ लाख १७ हजार रुपये तर आरोपी क्रमांक ६ संजना संजय परांजपे यांनी १५ लाख ६० हजार १०० रुपये वर्ग केल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे जाधव यांनी संजना परांजपे यांच्या खात्यात ३० लाख ७० हजार रुपये आणि कंपनीच्या देवगड येथील कामकाजाशी संबंधित ओंकार धामणेकर यांच्या खात्यात ५ लाख २७ हजार रुपये वर्ग केल्याचे तपासात समोर आले आहे.

तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने पत्नी आणि इतर नातेवाईकांच्या खात्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर रक्कम हस्तांतरित केली आहे. या आर्थिक व्यवहारांचा उद्देश आणि स्वरूप समजून घेण्यासाठी आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक केल्यानंतर देण्यात आलेले आयडी क्रमांक कशा पद्धतीने तयार केले जात होते, त्यामागील प्रणाली काय होती आणि त्याचा वापर कसा करण्यात आला, याचाही तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

तपासादरम्यान आरोपी अनिल जाधव यांनी विविध मोबाईल सिमकार्ड, पॅनकार्ड आणि आधारकार्डचा वापर केल्याचे आढळून आले आहे. एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणांचे पत्ते वापरल्याचा संशय असून मालवण, बांदा, पिंगुळी, कुडाळ, नवी मुंबई, कामोठे, घणसोली आणि पनवेल आदी भागांतील पत्त्यांचा वापर करण्यात आल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.

वेदिक आयुकेयर हेल्थ अँड रिटेल प्रा. लि. आणि ऑक्सीस ई कॉर्प सोल्युशन प्रा. लि. या कंपन्यांच्या नावाने किराणा आणि मेडिकल दुकाने चालवली जात होती. या दुकानांचे संचालन कोण करत होते, खरेदी-विक्री व्यवहार कसे होत होते, ग्राहकांना सवलती कशा दिल्या जात होत्या, तसेच कंपनीची कागदपत्रे, लॅपटॉप आणि अन्य साहित्य सध्या कुठे आहे, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयास सांगितले आहे.

एकूणच, कोट्यवधी रुपयांच्या या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात अनिल जाधव यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचा दावा तपास यंत्रणेने केला असून पुढील तपासासाठी त्यांचा प्रत्यक्ष ताबा आवश्यक असल्याचे न्यायालयात मांडण्यात आले आहे.
सदर गुन्हयांतील अर्जदार आरोपीत क्र. 05 अनिल जाधव हा मुख्य असुन अन्य आरोपीत क्र. 01 ते 04 व 06 ते 11 हे त्यांचे अत्यंत जवळचे व विश्वासु सहकारी असुन ते एकोप्याने रहाणारे असुन त्यांचे बॅन्क खात्यातुन एकमेकांचे बॅन्क खात्यात रक्कमा वर्ग झाल्याचे दिसुन येत आहेत त्याबाबत त्यांचेकडे प्रत्यक्ष तपास करणे अत्यंत महत्वाचे आहे.
सरकारी वकील रुपेश देसाई यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. त्रिपाठी यांनी वरील सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असणार आहे.

error: Content is protected !!