देवगड (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे व त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळावी या उद्देशाने दीक्षित फाउंडेशनच्या वतीने शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या “निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित संगणक प्रशिक्षण केंद्र” या केंद्राचा नामफलक अनावरण व उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या केंद्राचे उद्घाटन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक, देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबईचे उपाध्यक्ष तथा प्रमुख देणगीदार निरंजन निळकंठ दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार होते. यावेळी खजिनदार प्रदीप आंबेरकर, स्थानिक समिती सचिव ॲड. अविनाश माणगावकर, स्थानिक समिती उपाध्यक्षा अर्चना नेने, खजिनदार दत्तात्रय जोशी, सदस्य विलास रुमडे, डॉ. पुष्कर आपटे, दयानंद पाटील, देणगीदार राजेंद्र हिंदळेकर, माजी मुख्याध्यापक संजीव राऊत, महादेव घोलराखे, मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, पर्यवेक्षिका निशा दहिबावकर, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, पत्रकार अयोध्याप्रसाद गावकर, प्रशांत वाडेकर, राजू पडवळ, सुरज कोयंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नामफलकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत पर्यवेक्षिका निशा दहिबावकर यांनी केले. अध्यक्ष सदानंद पवार यांच्या हस्ते प्रमुख देणगीदार निरंजन दीक्षित यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात ॲड. अविनाश माणगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा व कौशल्याचा विकास करणारे उपक्रम संस्था सातत्याने राबवत राहील, असे सांगितले. तर दत्तात्रय जोशी यांनी आधुनिक युगात संगणक शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले. प्रमुख देणगीदार निरंजन निळकंठ दीक्षित यांनी आपल्या मनोगतात संगणक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करून विविध क्षेत्रांत प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच या संगणक प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक शिक्षणाची सुविधा उपलब्ध होऊन त्यांच्या कौशल्य विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सागर कार्णिक यांनी केले.











