सिंधुदुर्गात ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’; ३१ जुलैपर्यंत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपायांवर भर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे अतिसारजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान २०२६’ राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलात आणले जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली. अतिसार हा विशेषतः पाच वर्षांखालील बालकांसाठी जीवघेणा ठरू शकणारा आजार असून, सुरक्षित पिण्याचे पाणी, साबणाने हात धुण्याची सवय, परिसर स्वच्छता आणि योग्य स्वच्छताविषयक पद्धतींचा अवलंब केल्यास या आजारावर प्रभावी नियंत्रण मिळविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाय अधिक बळकट करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरोग्य विभाग, ग्रामपंचायत, पाणी व स्वच्छता, शिक्षण, महिला व बालविकास तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि विविध सामाजिक संस्थांच्या समन्वयातून हे अभियान राबविले जाणार आहे. अभियानांतर्गत तालुका व ग्रामस्तरावर बैठका घेण्यात येणार असून ग्रामपंचायती, पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या, शाळा आणि अंगणवाडी केंद्रांपर्यंत जनजागृती केली जाणार आहे. गावनिहाय पाणी गुणवत्तेची तपासणी करून सर्व स्रोतांची नियमित चाचणी केली जाईल. विद्यार्थी व स्वयंसेवकांना फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून पाणी तपासणीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती दुरुस्ती, पाणी साठवण टाक्यांची स्वच्छता व निर्जंतुकीकरण तसेच पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरीनीकरण करून नळाद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्यात किमान ०.२ पीपीएम मुक्त अवशिष्ट क्लोरीन राखण्यावर भर दिला जाणार आहे.

या अभियानादरम्यान हात धुण्याचे महत्त्व, सुरक्षित पाणी वापर, अन्न स्वच्छतेचे नियम आणि अतिसार प्रतिबंध याबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारीमुक्त स्थितीची शाश्वतता राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था, ISAs, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान यशस्वी करण्यावर भर दिला जाणार असून पाणी गुणवत्तेशी संबंधित तक्रारींचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाणार आहे.

error: Content is protected !!