ओरोस (प्रतिनिधी) : “शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचविण्यासोबतच प्राकृतिक शेतीचा व्यापक प्रसार करणे ही काळाची गरज आहे. समृद्ध शेतकरी व विकसित भारत या संकल्पनेला गती देण्यासाठी किसान मोर्चाने गावोगावी शेतकरी मेळावे आणि जनजागृती उपक्रम राबवावेत,” असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने प्राकृतिक (नैसर्गिक) शेती संमेलन आयोजित करण्यात येत आहे. याबाबतची जिल्हा बैठक वसंत स्मृती, जिल्हा कार्यालय, ओरोस येथे पार पडली.
या बैठकीत प्रभाकर सावंत यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध शेतकरी हिताच्या योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले.
किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी प्राकृतिक शेतीचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले की, ही शेतीपद्धती केवळ उत्पादन वाढीसाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासह पर्यावरण संवर्धनासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. या पद्धतीचा प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी शेतकऱ्यांनी संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
“समृद्ध शेतकरी – विकसित भारत” या संकल्पनेला बळ देण्यासाठी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृषी विकास धोरणांना पूरक म्हणून हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे.या अंतर्गत दि. २५ जून रोजी वैभववाडी येथे तसेच दि. ३० जून रोजी सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र कॅम्प येथे प्राकृतिक शेती संमेलन आयोजित करण्यात आले आहे.“प्राकृतिक शेती ही आत्मनिर्भर शेतकऱ्यांच्या निर्मितीचा भक्कम पाया असून या अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या बैठकीस भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळ देसाई, किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील, कुडाळ तालुका अध्यक्ष वैभव शेणई आदी उपस्थित होते.











