माजी सरपंच अतुल दळवी यांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल २० वर्षे दिवस-रात्र अविरत सेवा बजावणारे डॉ. कुबेर मिठारी यांनी “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हा मंत्र अंगीकारून आपल्या सेवाकाळात अनेक रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा दिली. कळसुली, शिरवल, हळवल, कसवण-तळवडे, बोर्डवे, वागदे, ओसरगाव आदी गावांमध्ये थेट रुग्णांपर्यंत जावून रात्री अपरात्री आरोग्य सेवेचा धर्म जोपासला. पंरतु, त्यांची काही कारणामुळे बदली झाली होती. आता पुन्हा कळसुली आरोग्य केंद्रात डॉ. कुबेर मिठारी यांची पुन्हा नियुक्ती करा, अशी मागणी कळसुली माजी सरपंच अतुल दळवी यांनी जिल्हा आरोग्य विभागाकडे केली आहे. डॉ. मिठारी यांची कळसुली येथून बदली झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली, असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही योग्य तो निर्णय न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा सुरु होत आहे, त्यामुळे तापसरी व संसर्ग जन्य आजाराचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉ. कुबेर मिठारी यांची कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरुपी नियुक्ती व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.











