‘मला कोणाचा अपमान करायचा नव्हता!’

कणकवली प्रांताधिकाऱ्यांकडून त्या प्रकाराबद्दल दिलगिरी : दिलगिरीपत्र प्राप्त झाल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणादरम्यान एका शिक्षकाला असंवैधानिक शब्द वापरून अपमानित केल्याच्या प्रकरणाबाबत कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मला कोणाचा अपमान करायचा नव्हता. जे झाले ते अनवधानाने झाले’, असे त्यांनी दिलगिरीपत्रात नमूद केले आहे. प्रांताधिकाऱ्यांचे दिलगिरीपत्र प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनालाही कळविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

बीएलओ कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या देवगड तालुक्यातील कर्मचाऱ्यांसाठी देवगड येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या सकाळच्या सत्रात शाळा भरत असल्याने २५ रोजी गुरुवारी सकाळच्या सत्रातील शाळेचे कामकाज आटोपून शिक्षक या प्रशिक्षणाला गेले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेला प्रशिक्षण कार्यक्रम दुपारी २.३० पर्यंत सुरू होता.

दरम्यान, सकाळच्या शाळा कामकाजासाठी सकाळी लवकर निघालेल्या शिक्षकांनी बीएलओ प्रशिक्षणादरम्यान काही काळ विश्रांतीसाठी सुट्टी देण्याची मागणी केली होती. मात्र, प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी संबंधित शिक्षकांना अपशब्द वापरून अपमानित केले होते. जिल्हाभर याचे पडसाद उमटले होते. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने यावर आक्षेप घेतला होता. अध्यक्ष राजन कोरगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच सोमवार, २९ रोजी निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर, प्रांताधिकाऱ्यांनी दिलगिरीपत्र दिल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी दिली आहे. ‘मला कोणाचा अपमान करायचा नव्हता. जे झाले ते अनावधानाने झाले’, असे त्यांनी पत्रात नमूद केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या पत्राची प्रत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनाच्या भूमिकेवर समन्वय समिती ठाम

राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने या दिलगिरीपत्राची कोणतीही माहिती किंवा प्रत संघटनेला मिळालेली नसल्याचा दावा केला आहे. समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर यांनी संघटनेची नाराजी अद्याप कायम असून या प्रकरणाच्या निषेधार्थ पूर्वनियोजित आंदोलनही छेडले जाणार असल्याचे सांगितले. मात्र, या आंदोलनाच्या जागेत बदल करण्यात आला असून सोमवारी देवगडऐवजी कणकवली प्रांत कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. केवळ शिक्षकच नाही, तर राज्य शासकीय सेवेतील कर्मचारीही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!