निखिल कन्स्ट्रक्शनच्या प्रसाद शेळके यांची तत्परता ! दोन जेसीपी लावून धुवांधार पावसात रस्ता मोकळा केला.
प्रशासनाकडून वाहतूक पोलिसांची घटनास्थळी धाव ! ग्रामस्थांची ही मदत !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : रविवारी घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगात, संततधार कोसळणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे, रात्री आठच्या दरम्यान गावापासून सुमारे आठ किलोमीटर (60/ 860) वर भले मोठे झाड व त्यासोबत माती, दगड , दरडी चा मलबा रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही कडील वाहतूक बंद झाली.
एस.टी गाडीतील प्रवाशांनी फोंडाघाट गावातील मदत करणाऱ्या ग्रामस्थांना याबाबत कल्पना दिली. पत्रकार कुमार नाडकर्णी यांनी प्रवासी अडकल्याची माहिती निखिल कन्स्ट्रक्शन चे व्यवस्थापक प्रसाद शेळके यांना देताच, दोन जेसीपी व त्यांची कामगार यंत्रणेसह ते घटनास्थळी तातडीने पोचले.
घटनास्थळावरील मोठे झाड कापून माती, दगड व मोठाल्या दरडी बाजूस करण्याचे काम शीघ्र गतीने सुरू केले.चेक पोस्ट- फोंडाघाट येथील पोलिसांनी आपल्या संबंधित विभागाला घटनेची माहिती दिली. लगोलग आरटीओ कार्यालयातील पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य शिताफिने पार पाडण्यास सहकार्य केले. गावाकडील ग्रामस्थांनी सुद्धा धाव घेऊन आपल्या परीने मदत व सहकार्य केले.
अखेर संततधार पावसात व प्रतिकूल परिस्थितीत सर्वांनी, विशेषतः निखिल कन्स्ट्रक्शनचे प्रशाद शेळके आणि कामगार, आरटीओ पोलीस तसेच ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमानंतर सुमारे अडीच ते तीन तासांनी, रात्री अकरा वाजता दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात यश आले .अडकलेल्या प्रवासी, वाहन चालक यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
यानंतर सुद्धा कोकणात घाट परिसरात धुवांधार कोसळणाऱ्या पर्जन्यवृष्टीमुळे, घाटातील दरडी कोसळून, अपघातात रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन, वाहतूक पोलीस विभाग, आणि ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन ने सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवासी, वाहन चालक सुरक्षित राहतील अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे….












