आंबडपाल येथे १ जुलैला जिल्हास्तरीय कृषी दिन शेतकरी मेळावा; पालकमंत्री नितेश राणे करणार उद्घाटन

बदलत्या हवामानावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कृषी अवजारांचे प्रदर्शन व श्री पद्धतीच्या भात लागवडीचे प्रात्यक्षिक

सिंधुदुर्गला ८० कोटींची नुकसानभरपाई मिळाल्याबद्दल दादा साईल यांचे समाधान

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता आंबडपाल (ता. कुडाळ) येथील भद्रकाली मंदिर शेजारील सभागृहात कृषी दिन २०२६ निमित्त शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपाध्यक्ष दादा साईल यांनी दिली.

या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत राहणार असून, लोकसभा सदस्य नारायण राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे तसेच आमदार निलेश राणे आणि दीपक केसरकर यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या कृषी मेळावा कार्यक्रमात उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील डॉ. विजय दळवी तसेच ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदे येथील डॉ. यशवंत मुटाळ हे बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, त्यावरील उपाययोजना व आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रगतशील शेतकऱ्यांची मनोगते, मान्यवरांचे मार्गदर्शन, वृक्षारोपण आणि श्री पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी कृषी अवजारांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे .

जिल्ह्यासाठी ८० कोटी नुकसान भरपाई

शासनाने शेतकऱ्यासाठी २१० कोटी नुकसान भरपाई जाहीर केली आहे .त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला ८० कोटी निधी मिळाला आहे . यासाठी कुडाळ- मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी अभ्यासपूर्ण मुद्दा उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते , तर पालकमंत्री नितेश राणे यांनीही हा मुद्दा लाऊंन धरत जिल्ह्यासाठी अधिकचा निधी मिळऊन दिला आहे . याबाबत आज जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साइल यांनी त्यांचे आभार मानले .
तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून १ जुलै रोजीच्या कृषी मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांनी केले आहे.

error: Content is protected !!