राष्ट्रीय एकतेचा संदेश घेऊन उद्या सिंधुदुर्गात मोटारसायकल रॅली !

अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा जागर; जिल्ह्यातून १०७ किलोमीटरचा प्रवास, बांद्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वागत

ओरोस (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय मोटारसायकल रॅली उद्या (ता. २१) सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार आहे. ‘फाइट अगेन्स्ट ड्रग्ज’ (अंमली पदार्थांविरोधात लढा) हे घोषवाक्य घेऊन निघालेली ही रॅली जिल्ह्यातून १०७ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. गोव्यातून बांदा येथे दाखल होणाऱ्या या रॅलीचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार असून, राष्ट्रीय एकतेबरोबरच अंमली पदार्थमुक्त समाजाचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबरला गुजरातमधील केवडिया येथील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ येथे राष्ट्रीय एकता परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या परेडच्या अनुषंगाने देशभर राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये गोवा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आदी ठिकाणच्या पोलिस संघांचा सहभाग आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती करणे, हा या रॅलीचा प्रमुख उद्देश आहे.

ही मोटारसायकल रॅली बुधवारी (ता. २१) सकाळी अंदाजे अकरा वाजता गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. बांदा, कुडाळ, ओरोस आणि कणकवली या मार्गाने प्रवास करीत रॅली खारेपाटण येथे पोहोचणार आहे. तेथून ती रत्नागिरी जिल्ह्यात मार्गस्थ होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत रॅलीचा एकूण १०७ किलोमीटरचा प्रवास होणार आहे.

बांदा येथे रॅलीचे स्वागत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सध्या अंमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे तरुण पिढीसमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दलाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रॅलीतून अंमली पदार्थांविरोधात जनजागृती केली जाणार आहे. राष्ट्रीय एकतेचा संदेश देतानाच समाजाला व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दरम्यान, राष्ट्रीय स्तरावरील या उपक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोटारसायकल क्लब, बायकर क्लब तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिस दलाने केले आहे. इच्छुकांनी आपल्या मोटारसायकलींसह रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा, असे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

चौकट :
असा असेल रॅलीचा मार्ग
गोवा – बांदा – कुडाळ – ओरोस – कणकवली – खारेपाटण – रत्नागिरी
दिवस : बुधवार, २१ ऑक्टोबर
जिल्ह्यात प्रवेश : सकाळी अंदाजे ११ वाजता
जिल्ह्यातील प्रवास : १०७ किलोमीटर

सहभाग :
गोवा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप आदींचे पोलिस संघ
घोषवाक्य : ‘फाइट अगेन्स्ट ड्रग्ज’
उद्देश : राष्ट्रीय एकता आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृती

error: Content is protected !!