पालकमंत्री नितेश राणे यांचा घणाघात; शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य
ओरोस (प्रतिनिधी) : ‘‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवाजी पार्कवरून हिंदुत्वाचा विचार देशभर पोहोचविला, त्याच शिवाजी पार्कवरून उद्धव ठाकरे आता सत्तापरिवर्तनाची भाषा करीत आहेत. उमर खालिदच्या समर्थकांकडून होणारी सत्तापरिवर्तनाची भाषा आणि उद्धव ठाकरे यांची भाषा एकसारखीच आहे. देशात अराजकता निर्माण करू पाहणाऱ्या शक्तींना उद्धव ठाकरे पाठबळ देत आहेत,’’ असा गंभीर आरोप पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
शिवाजी पार्कवरील कालच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम उर्फ दादा साईल, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष मिलिंद मेस्त्री आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले, ‘‘शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा विचार मजबूत केला. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही घोषणा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली. मात्र, त्याच मैदानावर उभे राहून उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्या शक्तींना समर्थन देण्याची भूमिका घेतली. फ्रान्स, नेपाळ, बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात निर्माण करण्याची भाषा करणारे आणि उद्धव ठाकरे यांची भाषा यात कोणताही फरक राहिलेला नाही. अभिजीत दीपके यांचे उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जाहीर समर्थन केले. दीपके हे उमर खालिदचे समर्थक असल्याचा आमचा आरोप आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके कोणत्या विचारांना पाठिंबा देत आहेत, हे त्यांनी महाराष्ट्राला स्पष्ट करावे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांचे अफजल गुरूबाबतचे विचार एकदा वाचावेत. बाळासाहेबांची वाक्ये भाषणात वापरण्यापेक्षा त्यांच्याप्रमाणे ठाम हिंदुत्वाची भूमिका घेण्याची हिंमत दाखवावी. शिवाजी पार्कवरील व्यासपीठावर बाळासाहेबांच्या छायाचित्राऐवजी मोहम्मद अली जिना आणि उमर खालिद यांची छायाचित्रे लावावीत, असे मी यापूर्वीच सांगितले होते. कालच्या भाषणातून त्याचीच प्रचिती आली.’’ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याचाही राणे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल, तर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध करावा. राहुल गांधी यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे जाहीरपणे सांगावे. मात्र, सत्तेसाठी उद्धव ठाकरे अशी भूमिका घेणार नाहीत.’’ असा आरोप केला.
खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले, ‘‘राहुल गांधी व्हिएतनामला गेल्यामुळे देशात सत्तापरिवर्तन होणार, अशी भाषा संजय राऊत करीत आहेत. याचा अर्थ त्यांना स्वतःच्या नेत्याच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास नाही. राहुल गांधी यांच्या खांद्यावर बसूनच सत्तापरिवर्तन होऊ शकते, हे राऊत यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. एप्रिलमध्ये मोदी सरकार पडणार, असे भाकीतही त्यांनी केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेचा भक्कम पाठिंबा आहे. त्यामुळे सरकार पडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’’ मात्र, जानेवारी २०२७ मध्ये उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव मातोश्री मध्ये राहतात की जेल मध्ये ते पहिले पहा, असेही सांगितले.
कायदा-सुव्यवस्थेवरूनही प्रत्युत्तर
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘‘टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेनंतर राज्य पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली. अन्य राज्यांतील पोलिसांशी समन्वय साधून २४ तासांत संशयितांना पकडण्यात आले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घातले जात नाही. नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते,’’ असे ते म्हणाले. मात्र, दिशा साळियन आणि सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणांचाही संदर्भ देत राणे यांनी तत्कालीन ठाकरे सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणांच्या तपासाबाबत त्यांनी विविध आरोप केले. ‘‘स्वतःच्या कार्यकाळातील घटनांची उत्तरे न देता उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या सरकारला कायदा-सुव्यवस्थेचे धडे देऊ नयेत. आमच्या सरकारमध्ये कोणत्याही नागरिकावर हल्ला झाल्यास पोलिस तत्काळ कारवाई करतात,’’ असे राणे म्हणाले.
चौकट
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा लॉरेन्स बिश्नोईच्या संदर्भात केलेला उल्लेखही राणे यांनी फेटाळला. उद्धव ठाकरे यांच्यावर दाऊद इब्राहिमशी तुलना करणारी जहरी टीका करत त्यांनी ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. ‘‘शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा स्वाभिमान जागविला. त्याच ठिकाणी उभे राहून हिंदुत्वविरोधी शक्तांना पाठबळ देण्याची भाषा महाराष्ट्रातील हिंदू समाज कधीही स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्याचे उत्तर द्यावे लागेल,’’ असा इशाराही पालकमंत्री राणे यांनी दिला.
चौकट
‘ठाकरेंनी राहुल गांधींचा निषेध करावा’
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी जाहीर निषेध करून दाखवावा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे हिंदुत्वविरोधी विचारांना पाठबळ द्यायचे, ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्रातील जनता ओळखून आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,’’ असे आव्हान पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.










