जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचा अनोखा उपक्रम..!

दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजेसोबत वनराई बंधाऱ्याचे पूजन

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा दिला संदेश; सिद्धवाडी ग्रामस्थांच्या सहभागातून दोन वनराई बंधारे

कुडाळ (प्रतिनिधी) : दसरा म्हणजे विजयाचा, नवचैतन्याचा आणि विधायक संकल्पांचा सण. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी यंदाचा दसरा अनोख्या पद्धतीने साजरा करत जलसंधारणाचा संदेश दिला.

पारंपरिक शस्त्रपूजेसोबतच ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या महत्त्वपूर्ण संदेशाची जनजागृती करण्यासाठी दादा साईल यांनी आपल्या सिद्धवाडीतील ग्रामस्थांना एकत्र करत श्रमदानातून दोन वनराई बंधारे उभारले. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या दोन्ही वनराई बंधाऱ्यांचे पूजन करण्यात आले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पावसाचे पाणी वाहून न जाता ते अडवून जमिनीत मुरावे, भूजलपातळी वाढावी आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता यावी, या उद्देशाने वनराई बंधारे उभारण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल म्हणाले की, “दसऱ्याला शस्त्रपूजा करण्याची परंपरा आहे. मात्र आजच्या काळात पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे हीदेखील काळाची गरज आहे. त्यामुळे शस्त्रपूजेसोबत जलसंधारणाचा संकल्प आणि कृती करण्याचा हा प्रयत्न आहे.”

ग्रामस्थांच्या सहभागातून उभारण्यात आलेले हे दोन वनराई बंधारे लोकसहभागातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. गावागावांत अशाच प्रकारे जलसंधारणाची कामे हाती घेण्याची गरज असल्याचे दादा साईल यांनी यावेळी सांगितले.

दसऱ्याच्या पारंपरिक उत्सवाला जलसंवर्धनाची जोड देत जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी राबविलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.

error: Content is protected !!