जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट!

दुग्धव्यवसाय विस्तारासाठी जिल्हा बँकेचे आर्थिक पाठबळ; अध्यक्ष मनीष दळवी यांची ग्वाही

ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्धव्यवसायाला चालना देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी दुग्ध संस्थांनी पुढाकार घेऊन आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांची निवड करावी. दुग्धव्यवसायाच्या विस्तारासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करेल, अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेसंदर्भात आयोजित दुग्ध संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बँकेचे संचालक दिलीप रावराणे, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी व दुग्ध व्यावसायिक उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ‘‘गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचा विस्तार होणे आवश्यक आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने आपल्या गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना या व्यवसायाशी जोडून गट तयार करावा. गावागावांत असे गट निर्माण झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट सहज साध्य होईल.’’

दुग्धव्यवसायासाठी लाभार्थी निवडताना संबंधित शेतकऱ्याचा अनुभव, व्यवसायाची आवड आणि जनावरांची देखभाल करण्याची क्षमता विचारात घ्यावी. यंदा संभाव्य तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांची योग्य काळजी घेऊ शकणाऱ्या शेतकऱ्यांनाच प्राधान्य देणे आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांपेक्षा दुग्ध संस्थांना आपल्या कार्यक्षेत्रातील योग्य लाभार्थ्यांची अधिक चांगली माहिती असल्याने संस्थांनी या निवड प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

दुधाळ जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून प्रत्येक दूध उत्पादकाला किमान २० हजार रुपयांचे अतिरिक्त आर्थिक सहकार्य देण्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. दूध संकलन वाढविणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक मदत देण्याचा प्रस्तावही बँकेच्या संचालक मंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

‘नफा नव्हे, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण हेच उद्दिष्ट’
‘‘जिल्हा बँकेचा उद्देश केवळ नफा मिळविणे नसून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा आहे. आंबा, काजू पिकांवरील अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करायची आहे. दुग्ध संस्थांनी यासाठी पुढाकार घ्यावा. त्यांच्या पाठीशी जिल्हा बँक खंबीरपणे उभी राहील,’’ असे मनीष दळवी यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!