महिला तस्करीप्रकरणी आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावास!

एक लाख पाच हजारांचा दंड; पीडित महिलेला ५० हजार रुपये देण्याचे न्यायालयाचे आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : महिलेला वेश्या व्यवसायासाठी आणून तिचे लैंगिक शोषण करण्याच्या उद्देशाने तस्करी केल्याप्रकरणी आरोपी संतोष मधुकर लुडवे याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतील ५० हजार रुपये पीडित महिलेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

जुलै २०२३ मध्ये वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्यात सात साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. संतोष मधुकर लुडवे (रा. आजगाव, माळ्यारवाडी, ता. सावंतवाडी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जुलै २०२३ मध्ये वेंगुर्ला परिसरात महिलांना वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना पुरविले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेंगुर्ला पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचून कारवाई केली होती. या कारवाईत महिलेला वेश्या व्यवसायासाठी आणून ग्राहकांना पुरविल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७० तसेच स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी केला. तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, दोन पंच, पीडित महिला, बनावट ग्राहक तसेच योगेश वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. जिल्हा सरकारी वकील संदीप राणे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

साक्षीदारांच्या जबाबांसह तपासातील पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले. भारतीय दंड विधानाच्या कलम ३७० अन्वये दहा वर्षे सश्रम कारावास आणि एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. याशिवाय स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, कलम ४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तर कलम ५ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड अशी स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली.

या तिन्ही कलमांखालील दंड न भरल्यास प्रत्येकी दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच एकूण एक लाख पाच हजार रुपये दंडापैकी ५० हजार रुपये पीडित महिलेला देण्यात यावेत आणि उर्वरित रक्कम न्यायालयात जमा करण्यात यावी, असेही निकालात स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!