वन मॅन आर्मी सतेज पाटील यांचे सिंधुदुर्ग काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केले अभिनंदन

गोकुळ मधील ऐतिहासिक विजयाचे सतेज पाटील ठरलेत किंगमेकर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. गगनबावडा येथे बंटी पाटील यांची भेट घेत पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीने प्रतिष्ठेची केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या निवडणुकीत लक्ष घालून महायुतीचे उमेदवार निश्चित केले होते. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, महाडिक गट, दहा आमदार आणि एका खासदारासह महायुतीच्या दिग्गज नेत्यांनी गोकुळवर सत्ता मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसचे आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या सर्व ताकदीला समर्थपणे तोंड देत महायुतीच्या दिग्गजांचा पराभव केला. बंटी पाटील यांच्या या विजयाचे कौतुक करताना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हा केवळ निवडणुकीतील विजय नसून, त्यांच्या निस्वार्थ कार्याचा, अनेक वर्षांपासून जपलेल्या जनसंपर्काचा आणि सर्वसामान्य शेतकरी व दूध उत्पादकांच्या विश्वासाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.

सत्ता आणि यंत्रणेची मोठी ताकद समोर असतानाही बंटी पाटील यांनी दाखविलेली लढाऊ वृत्ती, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका आणि विकासाची दूरदृष्टी यामुळे हा विजय शक्य झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ निश्चितच अधिक प्रगती करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस साईनाथ चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी प्रकाश जैतापकर, उपाध्यक्ष नागेश मोर्ये, विजय प्रभू, सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, प्रविण वरुणकर, विनायक मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष बाबू गवस, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, मालवण तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंबुलकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाद धुरी, व्ही. के. सावंत, सुंदर सावंत, मंदार शिरसाट, तबरेज शेख, उल्हास शिरसाट, सखाराम खोचरे, सोनल सावंत, सुंदरवल्ली पडियाची, पीटर फर्नांडिस आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!