मौदे गावातील जमीन व्यवहारांची व प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाची सखोल चौकशी करा

वैभववाडी (प्रतिनीधी) : मौदे गावातील शेतजमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये अनियमितता झाल्याचा तसेच बनावट कागदपत्रांचा वापर आणि सरकारी जमिनींवर अतिक्रमण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर अतिक्रमणाची सुद्धा सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, वैभववाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या या निवेदनात मौदे गावातील विविध शेतजमणे खरेदी विक्री व्यवहारामध्ये बाहेरील व्यक्ती संस्था यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात येत असल्याचे तसेच काही व्यवहारांमध्ये संबंधित व्यक्तींनी आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी सादर केलेली कागदपत्रे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र प्रतिज्ञापत्र वारस नोंदी महसूल अभिलेख अथवा इतर कागदपत्रे खरी व कायदेशीर आहेत किंवा नाही याबाबत गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे.
शेतजमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. जमीन व्यवहारांमध्ये आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या आहेत की नाहीत, तसेच संबंधित कागदपत्रांची सत्यता पडताळण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच काही जमिनीमध्ये कोणत्यातरी प्रस्तावित चालू प्रकल्पाच्या नावाखाली जमीन मालकांची पूर्वपरवानगी,कायदेशीर हक्क शासकीय परवानगी नसताना प्रत्यक्ष जागेवर प्रवेश करून माती भरणे, रस्ता तयार करणे,  बांधकाम करणे, कुंपण करणे,जमीन सपाट करणे किंवा अन्य प्रकारे अतिक्रमण करून जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
सरकारी जमिनींच्या अतिक्रमणाची चौकशी करण्याची मागणी

गावातील सरकारी जमीन, गायरान जमीन, रस्ते, नाले तसेच सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या जमिनींवर अतिक्रमण झाले आहे का, याची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण झाले असल्यास संबंधित जमिनींची मोजणी करून अतिक्रमण निश्चित करावे आणि नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.तसेच संबंधित जमिनींचे सातबारा उतारे, आठ-अ उतारे, फेरफार नोंदी, गाव नमुने, मोजणी नकाशे आणि इतर महसुली अभिलेखांची सखोल तपासणी करावी. जमीन व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांमध्ये अनियमितता किंवा तफावत आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी आणि जमिनींच्या नोंदींची सत्यता पडताळून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी, मंडळ अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आल्या आहेत. या निवेदनावर  गावातील ग्रामस्थ  मोतीराम मोरे,  शंकर मोरे, विलास मोरे, प्रकाश मोरे, पंढरीनाथ डाफळे,सुरेश मोरे, कृष्णा मोरे, दीपक मोरे,दिलीप मोरे,सुभाष नागप, चंद्रकांत मोरे, शिवाजी मोरे, गौरव कांबळे आणि ऍड.अरविंद फोंडके  यांच्या सह्या आहेत.आता महसूल प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन काय कार्यवाही करते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!