वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्रामुळे सिंधुदुर्गात मत्स्यशेती आणि रोजगारक्रांतीचा नवा अध्याय – बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या विशेष पुढाकारातून व सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून वेंगुर्ला तालुक्यातील वाघेश्वर (उमादांडा) येथील सागरावर तब्बल २२.२४ कोटी रुपयांच्या निधीतून साकारत असलेला ‘बहुजातीय मत्स्यबीज उत्पादन प्रकल्प’ हा सिंधुदुर्गातील मत्स्यव्यवसाय, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक परिवर्तनाच्या दृष्टीने एक अत्यंत दूरदर्शी व क्रांतीकारी टप्पा ठरणार आहे. या ऐतिहासिक व महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या मत्स्योद्योजकता आणि किनारपट्टीच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळणार असून, याबद्दल गाबीत फिशरमन फेडरेशनच्या वतीने पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा आणि खाडी क्षेत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी या प्रकल्पामध्ये पारंपरिक मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे.  या केंद्रामध्ये कोळंबी, जीताडा, सी बास (तीस), कालव आणि शिंपले यांसारख्या विविध प्रजातींच्या दर्जेदार मत्स्यबीजांचे उत्पादन स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहे.  सुमारे २२.२४ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील १३६ गावांमधील किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांना व सुमारे ६,९४० हेक्टर निमखारे क्षेत्रातील मत्स्यशेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. मत्स्यबीज उत्पादन, संगोपन, खाद्यान्न पुरवठा, वाहतूक, तांत्रिक सेवा, पॅकिंग आणि विपणन (मार्केटिंग) या क्षेत्रामध्ये जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले तर स्थानिक तरुणांसाठी व महिला बचत गटांसाठी रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या शेकडो नव्या संधी उपलब्ध होतील.समुद्रातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला एक शाश्वत पर्याय उपलब्ध होईल, ज्यामुळे रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर प्रभावीपणे थांबण्यास मदत होईल.

जिल्ह्यात नदी व किनारपट्टी परिसरातील महिला बचत गट, मच्छीमार बांधव आणि युवा-युवतींना जिल्हा नियोजन समिती (DPDC) व सिंधुरत्न समृद्धी योजनेच्या माध्यमातून योग्य प्रशिक्षण (Training) आणि व्यावसायिक उभारणीसाठी शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यशेतीच्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने ‘ब्लू क्रांती’ (Blue Revolution) घडून येईल, असा दृढ विश्वास गाबीत फिशरमन फेडरेशनने व्यक्त केला आहे. यातून स्थानिक पातळीवरच आर्थिक समृद्धीचा नवा मार्ग मोकळा होईल.

फेडरेशनने स्पष्ट केले आहे की, प्रशासकीय यंत्रणेद्वारे मच्छिमार समाजाला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे आकर्षित करण्यासाठी ठोस नियोजन होणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक मच्छिमार संस्थांचे काम केवळ मच्छिमार सभासदांना सभासद योजनेसाठी दाखला देणे एवढ्यापुरताच मर्यादित राहिले आहे. मच्छिमार ना बळ देणाऱ्या सहकारी संस्था बंद स्थितीत जाणाच्या स्थितीत आहेत या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मच्छिमार संस्थांना या मुख्य प्रवाहात जोडणे आवश्यक असून, यासाठी जिल्ह्यातील सर्व संस्थांना एकाच छताखाली आणून सर्वंकष नियोजन करण्याचे स्पष्ट आदेश मत्स्यव्यवसाय विभागाला देणे पालकमंत्री तथा मत्स्यविकास, बंदर मंत्री नितेश राणे यांनी देणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी गाबीत फिशरमन फेडरेशनतर्फे करण्यात येत आहे.

हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित व्हावा, यासाठी स्थानिक मच्छीमारांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, वेळेवर प्रशिक्षण देणे आणि बँका व स्थानिक उद्योजकांमध्ये सुयोग्य समन्वय प्रस्थापित करणे अत्यंत गरजेचे आहे. 

मच्छीमार बांधवांच्या आर्थिक सक्षमतेसाठी आणि सिंधुदुर्गाच्या शाश्वत विकासासाठी सदैव तत्पर असणारे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांनी घेतलेला हा पुढाकार सिंधुदुर्गाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरेलं गाबीत समाज आणि तमाम मच्छीमार बांधवांच्या वतीने गाबीत फिशरमन फेडरेशन पुन्हा एकदा पालकमंत्री महोदयांचे आभार मानत आहे अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष गाबीत फेडरेशन यांनी केले आहे.

error: Content is protected !!