शासकीय योजनांमध्ये महिलांना मोठी संधी- आ. वैभव नाईक

कुडाळमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : शासनाचा प्रत्येक उपक्रम हा लोकांसाठीच असतो, त्याच पार्श्वभूमीवर आज प्रत्येक योजनेचा लाभ सर्व सामान्य महिलांना मिळावा यासाठी स्त्रीशक्ती समस्या शिबिर व शासन आपल्या दारी हा उपक्रम कुडाळ तालुका प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला या उपक्रमात शासकीय योजनांच्या लाभासाठी महिलांना मोठी संधी आहे. या योजनांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी केले. यावेळी विविध शासकीय विभागाच्या योजनांच्या लाभार्थ्यांना योजना मंजुरीची पत्रे आ. वैभव नाईक ,जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. या उपक्रमाला कुडाळ तालुक्यातील महिलांची मोठी उपस्थिती होती.
कुडाळ तालुका प्रशासनाच्या वतीने शासन आपल्या दारी व महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिर सशक्त नारी समुध्द भारत हा उपक्रम मंगळवारी कुडाळ येथील सिद्धिविनायक हाॅल येथे आयोजित करण्यात आला होता.मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.नगरपंचायत,उमेद, महिला बाल विकास विभाग,आरटीओ, शिक्षण, वनविभाग, आरोग्य,समाज कल्याण, एसटी महामंडळ, बचत गट, पोस्ट ऑफिस असे विविध २७ विभागांचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले होते.त्या स्टॉलवर विविध योजनांबाबत महिलांना माहिती देण्यात आली. आ.वैभव नाईक यांनी देखील विविध स्टॉल ला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
यावेळी कुडाळ उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, तहसिलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गीता पाटकर – पई, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळकृष्ण परब, प्रभारी गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांबळी,तालुका कृषी अधिकारी अश्विनी घाटकर, नायब तहसिलदार उदय दाभोलकर, शामराव पेजेस विभागाचे निशिकांत नार्वेकर, श्रीनिधी देशपांडे, वनविभागाचे सु.प्र.सावंत, संजय गांधी निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष अतुल बंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!