मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रात महत्वपुर्ण ठसा उमटविणार्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने विद्रोही साहित्य संमेलने भरविण्यात येतात. साधारणत: दरवर्षी होणार्या या साहित्य संमेलनापूर्वी वर्षभर विविध कार्यक्रम सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित केले जातात. त्यात विविध जिल्ह्यात कवितेची शिबीरे, कविता संग्रह-कादंबरी आदी साहित्याचे प्रकाशन समारंभ, लेखन कार्यशाळा इ. आयोजित करण्यात येतात. अर्थात यासाठी गंभीरपणे वैचारिक चिंतन बैठकीची आवश्यकता असते. याच मुख्य उद्देशाने विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने वार्षिक चिंतन शिबीराचे अयोजन करण्यात येते. यंदाचे चिंतन शिबीर मालवण येथील सेवांगण मध्ये पार पडणार आहे. राज्यातील निवड झालेल्या प्रतिनिधिंसाठीच हे शिबीर आयोजित करण्यात येते.
यंदाच्या वर्षी शिबीरात महाराष्ट्रातील प्रख्यात अभ्यासक, विचारवंत, नामवंत साहित्यिक यांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या देशात असहिष्णू वृत्ती थैमान घालत आहे. भारतीय नागरिकांनी काय खावे, काय खाऊ नये, कोणत्या प्रकारचा विचार करावा आणि करून नये, लग्न-प्रेम कोणाशी करावे आणि करू नये, ‘हिंदू स्त्रियांनी किती अपत्ये जन्माला घालावी इ. संदर्भात विषमतावादी विचार व संस्कृती लादण्याचे प्रकार आणि त्यासाठी हिंसा आणि दहशतीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. स्वयंघोषित गोरक्षक उद्दामपणे कायदा हातात घेऊन उन्मादाने पछाडलेले जमाव सोबत घेऊन मॉब लिंचिंग-हत्याकांडे घडवत आहेत. संस्कृतीच्या संभावित टेहाळणी बुरूजांवरून सामान्यजनांच्या जीवनावर नियंत्रण गाजविले जात आहे. संसद, न्यायपालिका, आर्थिक संस्था, अशा सर्व लोकशाही संस्था खिळखिळ्या केल्या जात आहेत. सांस्कृतिक दहशतवाद आक्रमकपणे अमलात आणला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत पुरुषी-ब्राह्मणी-फसिस्ट शक्तींचा नंगानाच चालू आहे. इतिहास-संस्कृती-परंपरेचा गैरवापर करत खोट्यानाट्या कंड्या पिकवत जाणीवपूर्वक ’हिंसेचे शास्त्र’ तयार करणार्यांना राज्यकर्त्यांकडून बहुमान मिळत आहे.
बहुजन समाजाला अवमानित करण्यासाठी महामानवांच्या इतिहासाचे विकृतीकरण केले जात आहे. समतावादी विचारांना देशद्रोही ठरवले जात आहे. डॉ. दाभोलकर, कॉ.पानसरे, डॉ.कलबुर्गी, गौरी लंकेश यांचे खुनी अजुनही मोकाट आहेत. इतिहासाचे विकृतीकरण, शिक्षणाचे ब्राह्मणीकरण, राज्यघटना बदलाचे राजकारण, समाजाचे जातीजमातीत विभागणीकरण, लैंगिकतेचे वस्तूकरण, आदिवासींचे वनवासीकरण यातून भारतीय संस्कृतीच्या मूळावर हल्ले चढवले जात आहेत. राज्यघटनेने जनतेला दिलेले हक्क काढून घेण्याचे काम चालले आहे. शेतकरी आंदोलकांना व पाठिंबा देणार्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित,भटके, विमुक्त, आदिवासी, बहुजन,अल्पसंख्यांक भयभीत झाले आहेत. अशा उच्चजातवर्गपितृत्ताक हुकुमशाहीविरोधात कुठल्याही सांस्कृतिक-राजकीय दहशतवादाला बळी न पडता, अघोषित आणीबाणीला विरोध करत सामान्य जनतेच्या बाजूने उभे रहाणे हीच एकमेव लोकशाहीवादी, खरी समतावादी, स्वाभिमानी कृती आहे.
हा लढा उभारताना समतावादी मूल्य-संस्कृतीची पेरणी होणे गरजेचे आहे. विचारांच्या मशागतीसाठी समकालिन नवी आव्हाने समजून घेणे गरजेचे आहे. तत्वबोधासाठी तत्वचिंतन गरजेचे असते. म्हणूनच या चिंतन शिबीरात मराठी साहित्य : स्थिती आणि गती, विद्रोही सांस्कृतिक चळवळ: भूमिका आणि व्यवहार , तंत्रवैज्ञानिक क्रांती, डिजीटल भांडवलशाही आणि नवी सांस्कृतिक आव्हाने, भारतीय संविधान आणि लोकशाही आदी विषयांवर मांडणी व चर्चा करण्यात येणार आहे.
विद्रोही चिंतन शिबीराचे उद्घाटन जेष्ठ साहित्यिक-गांधी मरत नाही या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक मा. चंद्रकांत वानखेडे (नागपूर) यांच्या हस्ते होणार आहे. तर जेष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर (सिंधुदुर्ग), डॉ. दिलीप चव्हाण (नांदेड), डॉ. देवंद्र इंगळे (जळगाव), मांडणी करणार आहेत. कोकणातून जेष्ठ मालवणी कवी रुझारिओ पिंटो, जेष्ठ नेत्या कमलताई परुळेकर, अॅड. संदिप निंबाळकर, मा. विश्वनाथ कदम, सिध्दार्थ जाधव,संदीप कदम,सिध्दार्थ तांबे, सुरेश कदम,महेश परुळेकर,सूर्यकांत कदम,तर उर्वरित महाराष्ट्रातुन डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. देवेंद्र इंगळे, सुभाष काकुते, डॉ. मारोती कसबा, डॉ. अंजुम कादरी, कवी यशवंत मकरंद, डॉ. विठ्ठल घुले, डॉ. सुरेेश शेळके, डॉ. अनिल जायभाये, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. प्रतिभा अहिरे,चित्रकार राजानंद सुरडकर, डॉ. अशोक चोपडे, एल.जे.गावीत आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी व शिबीर संयोजक सुदीप कांबळे आणि किशोर ढमाले यांनी दिली आहे.