अणसूर, नेरूर कर्याद-नारूर, भालावल ग्रामपंचायतीचा समावेश
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५-२६ च्या पहिल्या वर्षात सिंधुदुर्ग जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या अणसूर ग्रामपंचायत. द्वितीय नेरूर कर्याद-नारूर ग्रामपंचायत, तृतीय आलेल्या भालावल ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला. सोमवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत तिन्ही ग्रामपंचायतींचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. जिल्हापरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याहस्ते हा सत्कार संपन्न झाला. यावेळी उपाध्यक्ष तुकाराम ऊर्फ दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील, सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, सदस्य संदेश सावंत, मनोज रावराणे, नागेश आईर, संदीप गावडे, रुपेश कानडे, सुमेधा पाताडे, सुप्रिया वालावलकर आदींच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा झाला.
यावेळी तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच सत्यविजय गावडे, नूतन आईर, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, गावातील शासकीय कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. अभियानातील यश हे केवळ ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे नसून त्यासाठी योगदान देणारे कर्मचारी, ग्रामस्थ आणि गावातील विविध घटकांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्हा स्तरावर प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव करून त्यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले.











