बांदा (मंगल कामत) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावाचे रहिवासी असलेले रुपेश वासुदेव पंडित यांनी योग, न्यूरोसायन्स आणि सर्जनशील विचारप्रक्रिया या क्षेत्रांतील आंतरशाखीय संशोधनासाठी S-VYASA (Swami Vivekananda Yoga Anusandhana Samsthana), बेंगळुरू येथून योग आणि व्यवसाय व्यवस्थापन या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांचा संशोधन बचाव (PhD Defence) शनिवारी यशस्वीरीत्या पार पडला.
त्यांच्या संशोधनाचा विषय “Neurocognitive Effects of Guided Moving Meditation on Creative Cognition in Agri-Entrepreneurs – An Electroencephalographic Study” असा आहे.
हे संशोधन S-VYASA विद्यापीठाच्या प्रा. सोनी कुमारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यापीठाचे संस्थापक डॉ. नागेंद्र गुरुजी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून पूर्ण करण्यात आले. या संशोधनासाठी गोवा येथील मणिपाल हॉस्पिटलच्या न्यूरोफिजिशियन डॉ. पारुल दुबे यांचेही मोलाचे तज्ज्ञ मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.
या संशोधनामध्ये Guided Moving Meditation (GMM) या योगाधारित पद्धतीचा सर्जनशील विचारप्रक्रियेवर होणारा संभाव्य परिणाम वर्तनात्मक चाचण्या आणि EEG या वस्तुनिष्ठ न्यूरोफिजिओलॉजिकल मापनांच्या माध्यमातून अभ्यासण्यात आला.
या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्जनशीलतेचे मूल्यमापन केवळ वर्तनात्मक निकषांवर न करता मेंदूतील विद्युत क्रियाशीलता, विविध EEG वारंवारता पट्ट्यांतील बदल आणि coherence यांसारख्या न्यूरोफिजिओलॉजिकल घटकांचाही अभ्यास करण्यात आला. या निष्कर्षांमुळे योगाधारित ध्यानपद्धती आणि सर्जनशील संज्ञान यांच्यातील संभाव्य संबंधांचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी नवीन संशोधन दिशा उपलब्ध झाली आहे.
या संशोधनावर आधारित शोधनिबंध Scientific Reports (Nature Portfolio, Springer Nature) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामुळे योग, न्यूरोसायन्स आणि सर्जनशील संज्ञान या आंतरशाखीय संशोधन क्षेत्रातील अभ्यासाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळाले आहे.
योग आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधत मानवी संज्ञान, सर्जनशीलता आणि आरोग्यविषयक संशोधनाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरत आहे.
बांदा, सिंधुदुर्गच्या या सुपुत्राच्या उल्लेखनीय शैक्षणिक आणि संशोधनात्मक यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.












