खासदार नारायण राणे यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेती कु.मनस्या फाले हीला प्रतिष्ठेचा “प्रहार सन्मान पुरस्कार” प्रदान !

पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, नीलमताई आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती !

न्यू इंग्लिश स्कूल आणि फोंडाघाटवासियांसाठी गौरवास्पद क्षण !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट, न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी,कु. मनस्या निलेश फाले हिने आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरे जात,दिल्ली येथे परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्राचा भगवा फडकवला. आणि शूटिंगमध्ये सुवर्णवेध घेत गोल्ड मेडल पटकावले. याबद्दल तिचा खास. नारायणराव राणे यांचे हस्ते “प्रहार सन्मान पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. यावेळी तिच्याबरोबर तिची आई नीलम, मुख्या. प्रसाद पारकर, प्रशिक्षिका आर्या भोगले.इत्यादी उपस्थित होते. व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, संदेश पारकर, मनीष दळवी, प्रमोद कामत,सतीश सावंत, संपादक संतोष वायंगणकर,/ इत्यादी उपस्थित मान्यवरांनी मनस्येच्या दमदार कामगिरीचे कौतुक केले.

यावेळी ‘जिद्द जिथे असते, तिथे शिखरेही नतमस्तक होतात!’अशीच जिद्द, असाच अंगार आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक सुवर्णकन्या आज आपल्यात उपस्थित आहे.एका सर्वसामान्य कुटुंबातील वाघिणीने थेट दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राचा भगवा फडकवला आहे! न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट प्रशालेची सुवर्णकन्या— मनस्या निलेश फाले!”

“फायरिंग मधील अचूक लक्ष्यासाठी जेव्हा मनस्याची निवड झाली, तेव्हापासून सुरू झालेला तिचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एप्रिल महिन्यापासून ५८ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग, ओरोस येथे सुरू झालेली ती खडतर निवड चाचणी, पी.आय. स्टाफचे कठोर मार्गदर्शन, कोल्हापूर ग्रुपचे सिलेक्शन आणि त्यानंतर लागोपाठ चार कठीण कॅम्प्स… वाटेत अनेक अडथळे आले, पण मनस्या कधीच मागे हटली नाही!तिने राज्यपातळीवर सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर ‘माझ्या शाळेसाठी, गावासाठी आणि राज्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचंय’ या जिद्दीने ती थेट दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. आणि तिने करून दाखवलं! दिल्लीच्या राष्ट्रीय पातळीवर अचूक लक्षवेध करत तिने देशात सुवर्ण पदकाची कमाई केली!”

“या उत्तुंग यशामागे आहे एका पित्याची भक्कम साथ. भाजी विक्रीतून आपला संसार चालवणारे, अतिशय गरिबीतून कुटुंबाचा गाडा हाकणारे तिचे वडील श्री. निलेश फाले यांनी केलेल्या कष्टांना मनस्याने उत्तम संस्कारांची जोड दिली.
तसेच, ५८ व्या महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गचा संपूर्ण स्टाफ, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रसाद पारकर, एनसीसी ऑफिसर आर्या भोगले, एनसीसी ऑफिसर मारुती लाड, क्रीडा शिक्षक अजिंक्य पोकळे, सर्व शिक्षक, कर्मचारी, शाळेचे सन्माननीय संचालक मंडळ आणि संपूर्ण ग्रामस्थांची भक्कम ढाल मनस्याच्या पाठीशी उभी होती.तिच्या या ऐतिहासिक आणि देदिप्यमान कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिला ‘मुख्यमंत्री शिष्यवृत्ती’ देऊन सन्मानित केले आहे.

‘प्रहार’ च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, आपल्या सर्वांच्या लाडक्या मनस्या फाले हिला तिच्या या पराक्रमी प्रवासासाठी ‘प्रहार सन्मान’ प्रदान करण्यात येत आहे.तीच्या पुढील शैक्षणिक, आयुष्यासाठीही खुप खुप शुभेच्छा! ही मनष्याच्या वाटचालीची गौरवशाली डॉक्युमेंटरी सर्वांनाच अंतर्मुख करून गेली.फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश तथा राजू पटेल- सावंत यांनी उपस्थित राहून आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनीचा गुणगौरव अनुभवला.प्रतिष्ठेच्या “प्रहार सन्मान पुरस्कार” मिळाल्याबद्दल फोंडा हायस्कूल आणि ग्रामस्थांमध्ये मनस्याचे कौतुक होत आहे…

error: Content is protected !!