चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा – पेंडूर – होबळीचा माळ काळसे या रस्त्याची गेल्या तीन वर्षात चाळण झाली असून ठिकाणी खड्डे पडले असून अनेक ठिकाणी साईड पट्टीच वाहून गेली आहे. याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता पेंडूर नाका येथे कट्टा, पेंडूर, काळसे ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
कट्टा पेंडूर रस्त्याच्या बाबतीत 5 मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात येत आहे. यामध्ये मागील तीन वर्षातील रस्त्याच्या बांधकामाची सखोल तांत्रिक चौकशी व्हावी, निकृष्ट बांधकामास जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी, वारंवार करण्यात आलेल्या डागडुजीचा खर्च व कामकाजाचा दर्जा याची चौकशी व्हावी, संपूर्ण रस्त्याचे नव्याने दर्जेदार व टिकाऊ बांधकाम तातडीने करावे, पेंडूर गावचा मांड उत्सव यावर्षी होणार असून या मांड उत्सवापूर्वी रस्ता वाहतुकीस सुरक्षित सुस्थितीत बांधून मिळावा या प्रमुख मागाण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. यासंबंधीचे बॅनर ठीकठिकाणी लावण्यात आले आहेत.












