पत्रकारितेतील योगदानाबद्दल पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा डोंबिवली महोत्सवात विशेष गौरव!

मसुरे (प्रतिनिधी) : कोकणच्या समृद्ध लोककला, संस्कृती आणि पारंपरिक दशावतार कलेचा वारसा मुंबईसारख्या मायानगरीत जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था, डोंबिवली यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या डोंबिवली महोत्सवात पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मसुरे सुपुत्र पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश मुळीक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.

डोंबिवली येथील उमेशनगर, गावदेवी मैदान येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा दशावतार महोत्सव उत्साहात संपन्न झाला. कोकणच्या मातीत रुजलेल्या दशावतार कलेला मुंबई आणि उपनगरांमध्ये व्यासपीठ मिळवून देणे, पारंपरिक लोककलांचे संवर्धन करणे तसेच नव्या पिढीपर्यंत या सांस्कृतिक वारशाची ओळख पोहोचवणे, असे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था सातत्याने करीत आहे.

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी आजवर पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींना सातत्याने वाचा फोडली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर म्हणाले, “डोंबिवलीसारख्या मायानगरीत कोकणच्या लोककलेचा आणि दशावतार कलेचा वारसा जपण्यासाठी लोककला दशावतार नाट्य महोत्सव संस्था जे समर्पित भावनेने कार्य करीत आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या मातीतील कला, संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे संस्थेचे कार्य म्हणजे कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचा सन्मान आहे. आज या संस्थेने माझ्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन जो मानाचा सन्मान केला, तो माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. हा सन्मान मी कधीही विसरू शकणार नाही. संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश मुळीक आणि संपूर्ण संस्थेच्या परिवाराचा मी मनापासून ऋणी आहे.”

या महोत्सवाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक डॉ. दीपक मुळीक परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनीही संस्थेच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. कोकणच्या लोककला आणि पारंपरिक संस्कृतीला महानगरात व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. निलेश मुळीक यांनी संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आणि लोककला संवर्धनासाठी सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचा गौरव करताना ते म्हणाले, “दत्तप्रसाद पेडणेकर हे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांचे प्रश्न, सामाजिक कार्य आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने जनतेसमोर मांडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या लेखणीतून कोकणची संस्कृती, लोककला आणि सामाजिक कार्याला प्रसिद्धी मिळत आहे. अशा संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकाराचा सन्मान करणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.”

या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. निलेश श्रीधर मुळीक, सचिव गजानन गावकर, दाजी नार्वेकर, संतोष कोळबकर, बाबाजी आंबडोसकर, सुधीर पालव, वीणा सावंत, सचिन साफले, अर्जुन अहिर, श्री. गोडे साहेब, दिलीप भोगले, संजीव जोशी, संतोष गोठस्कर, स्नेहा कोरगावकर, विठ्ठल लाकम, राजन परब, विलास मेस्त्री यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि दशावतारप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!