राजर्षि शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांचे प्रतिबिंब राज्यघटनेत दिसुन येते

सतीश लळीत यांचे शाहु जयंतीनिमित्त कुडाळ येथे प्रतिपादन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): राजर्षि छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक न्यायाची जी संकल्पना शंभर वर्षांपुर्वी राबवली, त्या सामाजिक समतेच्या तत्वाचे, शाहुविचारांचे प्रतिबिंब आपल्या राज्यघटनेत ठायीठायी दिसुन येते. शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतील साधर्म्य यावरुन लक्षात येते, असे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सतीश लळीत यांनी शाहू जयंतीदिनी कुडाळ येथे केले. कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि अर्थशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राजर्षि शाहू जयंती कार्यक्रमात ‘राजर्षि शाहू : कृतीशील समाजसुधारक’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणुन ते बोलत होते. महाविद्यालयाच्या एकनाथ ठाकूर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे होते. व्यासपीठावर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. एन. लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. ए.चव्हाण, निमंत्रक प्रा. यु.एम. कामत, मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. शरयु आसोलकर उपस्थित होते. सुरुवातीला शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना वंदन करण्यात आले. श्री. सतीश लळीत यांनी राजर्षि शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची संकल्पना, ती अमलात आणण्यासाठी त्यांनी घेतलेले आणि अमलबजावणी केलेले विविध निर्णय यांची सोदाहरण माहिती दिली. ते म्हणाले की, शाहू महाराजांनी सामाजिक न्यायासाठी केलेल कार्य समजून घ्यायचे असेल तर त्यांनी सुरु केलेली वसतिगृहांची चळवळ, प्राथमिक शिक्षणाचा कायदा आणि त्याची कडक अंमलबजावणी, आरक्षणाचा क्रांतिकारक जाहीरनामा, अस्पृश्य उद्धाराची प्रत्यक्ष कृती, भटक्या विमुक्तांचा उद्धार करण्यासाठी राबविलेल्या योजना, जातीभेद निवारण चळवळ आणि स्त्री वर्गाच्या संरक्षणासाठी केलेले विविध कायदे लक्षात घ्यावे लागतील. या माध्यमातून त्यांनी समाजाने अव्हेरलेल्या, अन्याय केलेल्या अस्पृश्य, पददलित, भटक्या, विमुक्त, बहुजन समाजातील जनतेला मुख्य प्रवाहात आणून त्यांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून दिला. शंभर वर्षांपुर्वी ब्रिटिशांच्या कारकिर्दीत अशा प्रकारचे उत्तुंग कार्य करणे हे अलौकिक आहे. शाहू महाराजांनी मांडलेली ही सामाजिक न्यायाची, सामाजिक समानतेची संकल्पना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेत ठायीठायी दिसून येते. श्री. लळीत पुढे म्हणाले की, बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे असेल, तर शिक्षणाची कवाडे त्यांच्यासाठी खुली केली पाहिजेत, हे महाराजांनी ओळखले. यासाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. गावोगावी शाळांची स्थापना केली. कोल्हापूर शहरात विविध जाती, भटक्या व विमुक्त जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र २३ वसतिगृहे स्थापन केली. याबरोबरच जैन, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना करुन त्यांना स्वतंत्र इमारती, खुल्या जागा आणि खर्चासाठी निधी उपलब्ध करुन दिला. वसतिगृहांचा हा प्रयोग राज्यात पहिला आणि अभूतपूर्व असा होता. या वसतिगृहांमुळे जी मुले कधीही शाळेचे तोंड पाहु शकली नसती, ती शिकून पुढे आली. कर्मवीर भाऊराव पाटील हे या वसतिगृह चळवळीचे अपत्य होय. त्यांनी महाराजांपासुन प्रेरणा घेऊन पुढे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन महाराजांचे स्वप्न पुढे नेले. आरक्षणाचा क्रांतिकारक जाहीरनामा प्रसिद्ध करुन शाहू महाराजांनी असामान्य काम केले, असे सांगून श्री. लळीत म्हणाले की, महाराजांचे एक चरित्रकार धनंजय कीर यांनी त्यांचे वर्णन ‘नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत’ अशा यथार्थ शब्दांनी केले आहे ते यासाठीच. 1902 मध्ये शाहू महाराज सातव्या एडवर्ड बादशहाच्या राज्यारोहण समारंभास उपस्थित राहण्यासाठी लंडनला गेले होते. तिकडे युरोपच्या दौऱ्यावर असतानाच त्यांनी कोल्हापुरात 26 जुलै रोजी एक अभूतपूर्व आणि क्रांतिकारक असा जाहीरनामा प्रसिद्ध करविला. हा जाहीरनामा काढल्याच्या तारखेपासून रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा 50 जागा मागासलेल्या लोकांमधून भराव्या, या आशयाचा हा जाहीरनामा होता. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने हे एक प्रचंड मोठे पाऊल आणि मैलाचा दगड होता. बलुतेदारी’ पद्धत बंद करण्याचा निर्णय, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, पडदा पद्धतीचा निषेध, कौटुंबिक छळ आणि क्रुरतेची वागणुक विरोधी कायदा, घटस्फोट आणि वारसाचा कायदा, देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा असे साजिक न्यायाची स्थापना करणारे कित्येक क्रांतीकारक कायदे करुन आणि त्यांची अतिशय परिणामकारक अमलबजावणी करुन शाहू महाराजांनी सामाजिक क्रांती केली, असे श्री. लळीत म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. व्ही. बी. झोडगे यांनी शाहू महाराजांच्या चरित्राच्या विविध पैलुंवर प्रकाश पाडला. त्यांचे चरित्र समजून घेतानाच त्यातील किमान काही गोष्टींचा अंगिकार करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात श्री. लळीत यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना उद्योजकता प्रशिक्षण प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रा. डॉ. ए. एन. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. ए. चव्हाण यांनी श्री. लळीत यांचा परिचय करुन दिला. प्रा. यु.एम. कामत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रम अधिकारी श्रीमती सबा शाहा यांनी आभार मानले.

error: Content is protected !!