केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाकडील कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा २३ जुलै रोजी ११ वाजता शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागाकडे सुमारे ५५६ अधिकारी कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या विविध मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांबाबत चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध प्रलंबित मागण्याबाबत केंद्रीय मंत्री राणे यांचे लक्ष वेधणार आहेत . राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व स्थगिती दिलेल्या परिपत्रकाना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात मागील १२ ते १५ वर्षे अल्प मानधनात कार्यरत असलेल्या अनुभवी व कुशल कर्मचारी यांना न्याय मिळावा यासाठी शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत मात्र या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. यामध्ये राज्यातील आरोग्य व ग्रामविकासकडील रीक्त असलेल्या पदांवर नियमित सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार अनुभवी अधिकारी कर्मचाऱ्यांना ४० टक्के जागा आरक्षित ठेऊन वयाची अट शिथिल करण्यात यावी. वेतन सुसूत्रीकरणानुसार जुन्या व अनुभवी कर्मचाऱ्यांवर अन्याय झालेला असून सन २०१६ मध्ये नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यास अधिक पगार व सन २००७ मध्ये नियुक्ती दिलेल्या अनुभवी कर्मचाऱ्यास कमी पगार ही पगारातील तफावत दूर करून विशेष मानधन वाढ लागू करण्यात यावी. यासह विविध मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत गेली १५ वर्षे कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा अनुभव, कुशलता व कोविड आजारावेळी केलेल्या कामाचा सकारात्मक विचार करून शासनाने न्याय द्यावा. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे या मेळाव्यात लक्ष वेधण्यात येणार आहेत. अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी- कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमदीप पाताडे व सचिव सुवर्णा रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.











