३२ वर्षांच्या महसूल सेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल; पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
आचरा (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी फोंडाघाट-कुर्ली येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार दिलीप मारुती पाटील यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या आकुर्डी, पुणे येथील मुख्य कार्यालयात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिलीप पाटील यांनी महसूल विभागात तब्बल ३२ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. तलाठी, मंडळ अधिकारी ते निवासी नायब तहसीलदार अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला. स्वच्छ प्रतिमा, कर्तव्यनिष्ठा आणि आदर्शवत प्रशासकीय कामकाज यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श मंडळ अधिकारी’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. तसेच ‘कोकणरत्न’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
प्रशासकीय सेवेसोबतच सामाजिक क्षेत्रातही पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे. कोविड काळात त्यांनी केलेली कामगिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमधील सहभाग तसेच स्वच्छता मिशन सिंधुदुर्गमधील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग तलाठी संघाचे उपाध्यक्ष, फोंडाघाट-कुर्ली उत्कृष्ट मंडळाचे सल्लागार अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत.
त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा, सामाजिक कार्याचा आणि जनहितासाठी केलेल्या योगदानाचा विचार करून संघटनेच्या राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्य व कोकण विभागीय कार्यकारिणीने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.
दिलीप पाटील यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित परशुराम गंगावणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी, राष्ट्रीय सचिव प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष लक्ष्मण दवणे, महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभागीय सचिव प्रणव बांदिवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात पद्मश्री परशुराम गंगावणे यांच्या हस्ते कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक व कोकण विभागीय सचिव प्रणव बांदिवडेकर यांनाही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी कणकवली तालुकाध्यक्ष तथा स्पेक्टोमार्ट ऑप्टिकल्सचे संचालक मंगेश चव्हाण, ट्रॉफी हाऊसचे संचालक महेंद्र चव्हाण, सावंत आदी उपस्थित होते.
दिलीप पाटील यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा मानवाधिकार संरक्षणाच्या कार्यासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.











