शासन नियुक्त चार मतांचे गणित निर्णायक ठरल्याने राजेश पाटील यांच्या रूपाने महायुतीने गोकुळवर मिळवली सत्ता

शासननियुक्त मतांची साथ मिळाल्याने सतेज पाटील यांच्या राजकीय गडाला मोठा धक्का

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरच्या सहकार आणि राजकारणाचे केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात अखेर महायुतीने बाजी मारली. मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांनी १६ विरुद्ध १३ मतांनी विजय मिळवत चेअरमनपदाची खुर्ची पटकावली. मात्र, या विजयात शासन नियुक्त चार संचालकांच्या मतदानाने निर्णायक भूमिका बजावली. समविचारी आघाडीची १३ मते अभेद्य राहिली असली, तरी महायुतीच्या १२ संचालकांना या चार मतांची साथ मिळाल्याने सतेज पाटील यांच्या राजकीय गडाला मोठा धक्का बसला. त्यामुळे गोकुळची निवडणूक केवळ अध्यक्ष निवडीपुरती मर्यादित न राहता लोकशाही, शासन हस्तक्षेप आणि सहकारातील सत्ताकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

या सत्तासंघर्षातील सर्वात निर्णायक घडामोड औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीत घडली. शासन नियुक्त चार संचालकांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्याची मागणी समविचारी आघाडीकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने अंतरिम आदेशाद्वारे त्यांचा मतदानाचा अधिकार कायम ठेवला. मतदान स्वतंत्रपणे घेऊन त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे निर्देश देतानाच मतमोजणीत ही चार मते ग्राह्य धरण्याचे स्पष्ट केले. यामुळे महायुतीचे संख्याबळ १२ वरून थेट १६ वर पोहोचले आणि निवडणुकीचे गणितच बदलले.

दरम्यान, शासन नियुक्त संचालकांवरून सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चातून जोरदार टीका केली होती. डॉ. प्रवीणचंद्र बेंद्रे, शिवाजी आडनाईक, के. डी. पाटील आणि ॲड. प्रशांत पाटोळे यांच्या नियुक्त्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या नियुक्त्या राजकीय सोयीसाठी झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, न्यायालयीन आदेशामुळे या चारही संचालकांना मतदानाची संधी मिळाली.

मंगळवारी सकाळी गोकुळ शिरगाव येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया पार पडली. महायुतीकडून राजेश पाटील, तर समविचारी आघाडीकडून संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अखेर मतदानानंतर राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत विजय निश्चित केला. या विजयानंतर झालेल्या सभेत महायुतीच्या नेत्यांनी सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील, प्रकाश आबिटकर, धनंजय महाडिक, विनय कोरे आणि संजय मंडलिक यांनी विजयाचा जल्लोष केला. चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ कॉलचा संदर्भ देत सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले, तर हसन मुश्रीफ यांनी संघर्ष मोर्चावर टीका केली.

विशेष म्हणजे, समविचारी आघाडीची निवडून आलेली १३ मते अखेरपर्यंत कायम राहिली. त्यामुळे या पराभवामागे अंतर्गत फूट नसून शासन नियुक्त चार मतांचे गणित निर्णायक ठरल्याचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. राजेश पाटील यांच्या रूपाने महायुतीने गोकुळवर सत्ता मिळवली असली, तरी या निवडणुकीतील चार संचालकांच्या मतदानाचा कायदेशीर पेच अद्याप कायम आहे. त्यामुळे गोकुळच्या सत्तेचा हा डाव संपला असला, तरी कोल्हापूरच्या राजकारणातील संघर्षाची नवी खेळी आता सुरू होण्याची चिन्हे आहेत.

error: Content is protected !!