उत्तम पवार यांचा स्मृतिदिन संकल्प दिन म्हणून संपन्न

दर्पण प्रबोधिनीच्या वतीने विविध संकल्पांची उद्घोषणा

कणकवली (प्रतिनिधी) : सामाजिक परिवर्तनाचा ध्यास बाळगणारा सच्चा आंबेडकरी कार्यकर्ता, विद्रोही कवी आणि संस्थेचे प्रेरणास्थान उत्तम पवार यांचा सातवा स्मृतिदिन दर्पण प्रबोधिनीच्या वतीने संकल्प दिन म्हणून नुकताच संपन्न झाला. फुले-आंबेडकरी विचारधारा तळागाळापर्यंत रुजावी यासाठी सामाजिक परिवर्तनाची चळवळ अधिक गतिमान करून उत्तम पवार यांचे सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक कार्य पुढे न्यावे या उद्देशाने गेली सहा वर्षे संस्थेच्या वतीने समाजाभिमुख विविध संकल्पांची उद्घोषणा केली जाते. संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी संकल्प दिनानिमित्त मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांना आपले करिअर निवडताना विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे लागते, यासाठी आपण संस्थेच्या माध्यमातून करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास शिबीरे घेण्याचा संकल्प करत आहोत. यावेळी संस्थेचे सल्लागार प्रा.डाॅ.सोमनाथ कदम यांनीही उत्तम पवार यांचे सामाजिक, साहित्यिक कार्य पुढे नेण्यासाठी नवोदित लेखक, कवींसाठी लेखन कार्यशाळा आयोजित करून ‘लिहित्या हातांना’ मान्यवर साहित्यिकांचे मार्गदर्शन घेण्याचे संबोधित करून संस्थेच्या सर्व संकल्पांना सदिच्छा दिल्यात. यावेळी संस्थेचे सल्लागार प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, निवृत्त जिल्हाधिकारी सुरेश कदम,डाॅ.अशोक कदम, डाॅ.व्ही.जी.कदम, संतोष तांबे यांनीही संस्थेच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक उपक्रमांना सदिच्छा देताना सांगितले की, संस्थेने संकल्पित केलेल्या सर्व सामाजिक उपक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करावे, यासाठी आमचे नेहमीच सक्रीय आर्थिक योगदानही असेल. संस्थेचे ज्येष्ठ सदस्य कवी प्रा.सिद्धार्थ तांबे यांनीही संस्थेच्या वाचन चळवळीला अधिक गतिमान करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी आंबेडकरी साहित्यांचे वाचन करून आपली वैचारिक प्रगल्भता वाढवावी असा संकल्प व्यक्त करून संस्थेच्या प्रबुद्ध ग्रंथालयाला आपण दरवर्षी किमान दहा पुस्तके देण्याचा संकल्प केला. यावेळी उपस्थित संस्था पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांनीही या संकल्प दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करून उत्तम पवार यांना आदरांजली अर्पण केली. कार्यकर्त्यांमध्ये नेहमी सुसंवादक होत राहावा, सामाजिक चळवळीविषयी विचारांचे आदानप्रदान व्हावे यासाठी या संकल्प दिनाचे औचित्य साधून दर्पण संपर्क कार्यालयाचेही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

संकल्प दिनानिमित्त संस्थेच्या वतीने दहावी -बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना दरमहा ५००/- रु. शिष्यवृत्ती देण्यात येते.याहीवर्षी उत्तम पवार स्मृती-ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती कु.मंथन महेश तांबे (मसुरे, मालवण) आणि कु.आयुष मिलिंद साळसकर (कसवण, कणकवली) या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी संस्थेचे सदस्य किशोर कदम यांनी एका गरीब, होतकरू विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक प्रोत्साहनपर दरवर्षी एक हजार रुपये देण्याचा संकल्प व्यक्त यावर्षापासूनच त्या संकल्पाची सुरुवात केली कु.सरोज संजय कदम (कुवळे,देवगड) या होतकरू विद्यार्थिनीला शैक्षणिक सहाय्य देण्यात आले.याशिवाय ग्रामीण भागातील महिलांसाठी छोटे उद्योग व्यवसाय मार्गदर्शन, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निवेदन, संभाषण कौशल्य कार्यशाळा, त्रैमासिक व्याख्यानमाला, सन्मान आई-बाबांचा आणि इतर प्रासंगिक समाजाभिमुख संकल्प घेण्याची उद्घोषणा राजेश कदम यांनी आपल्या विवेचनामध्ये मांडलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!