एमडी शेखर चन्ने यांच्याशी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची सविस्तर चर्चा
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी एसटी महामंडळाचे एमडी शेखर चन्ने यांची मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयात भेट घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी बसस्थानकांची दुरावस्था , आवश्यक उपाययोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी कणकवली विधानसभा संघटक संदेश पटेल उपस्थित होते. जिल्ह्यातील एसटी च्या जवळपास सर्वच बसस्थानकांत प्रवासी समस्यांना तोंड देत आहेत. आग्रे यांनी चन्ने यांच्या शी चर्चा करताना प्रामुख्याने कणकवली विधानसभा मतदारसंघातील वैभववाडी एसटी बसस्थानकाची दुरावस्था मांडली. वैभववाडी बसस्थानकात असलेल्या अपुऱ्या सोयीसुविधा , प्रवासी निवारा शेड, प्रवाशांना आवश्यक असणारे पिण्याचे पाणी, शौचालय आदी सुविधांची अत्यावश्यकता असल्याचे आग्रे यांनी व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांच्या निदर्शनास आणून दिल्या. देवगड आणि वेंगुर्ले बस स्थानक नूतनीकरण साठी प्रत्येकी 2 कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरात लवकर टेंडर लावून नूतनीकरण चे दर्जेदार काम सुरू करावे अशी सूचनाही आग्रे यांनी केली. एमडी शेखर चन्ने यांनी आपण लवकरच सिंधुदुर्गात येऊन स्थानिक लोकप्रतिनिधी , एसटी चे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिले.












