कणकवली (प्रतिनिधी) : तालुका विधी सेवा समिती आणि कणकवली तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली कॉलेज कणकवली येथे रॅगिंग प्रतिबंधक कायदा मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री साळुंखे तसेच प्रमुख मान्यवर व व्याख्याते दिवाणी न्यायाधीश श्री. टी. एच. शेख, ॲड. मिलिंद सावंत, ॲड. रेखा सावंत, ॲड. योजना सावंत, ॲड. विष्णू पाताडे, प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा. अरुण चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्षांच्या शुभहस्ते मान्यवरांना गुलाब पुष्प व महाविद्यालयाचा ‘कनक’ वार्षिक अंक भेट देऊन स्वागत करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक शेख साहेब आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, आजच्या प्रत्येक तरुण विद्यार्थ्याला कायद्याची माहिती असणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः माहिती घ्यावी व ती आपल्या पुरती न ठेवता आपला मित्र, कुटुंब व समाजापर्यंत पोहोचवावी. आपल्या हातून गुन्हा घडणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे त्याबरोबरच आपल्यासमोर गुन्हा घडत असेल तर काय करावे याचे मार्गदर्शन करून घ्यावे. तसेच आपण कणकवली कॉलेज या एका नामांकित शिक्षण संकुलात शिक्षण घेत आहात. इथला विद्यार्थी शिस्त आणि शिक्षण याकडे काळजीपूर्वक लक्ष देतो असे कौतुक केले. महाविद्यालयीन स्तरावर मुलींसाठी स्व-संरक्षण शिबीर घेऊ शकतो असे सुचविले. ॲड. मिलिंद सावंत रॅगिंग प्रतिबंधक कायदा या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विविध ग्रामीण भागातून शहराकडे येतात तेव्हा आपल्याकडून अनावधानाने काही चूक घडू नये नाही व तो गुन्हा ठरू नये, याची काळजी घ्यावी. त्यासाठी गैर कृत्या पासून दूर राहावे. यासाठी कायदेविषयक ज्ञान व साक्षरता आजच्या पिढीत होणे गरजेचे आहे. एखाद्या विद्यार्थ्याला मानसिक-शारीरिक त्रास, मारहाण, व्यंगावरून चिडवणे, भिती निर्माण करणारी कृती करणे या साऱ्या गोष्टी रॅगिंग म्हणून समजल्या जातात. असा भयभीत विद्यार्थी आपलं शिक्षण किंवा जीवन संपवतो, यासाठी रॅगिंग विरोधी कायदा समजून घेणे गरजेचे आहे. तरुण विद्यार्थ्यांनी रॅगिंग विरुद्धच्या महाराष्ट्रातील कायद्याची व भारतीय दंड संहितेतील तरतूद समजून घ्यावी असे प्रतिपादन केले.
ॲड. रेखा सावंत यांनी 12 ऑगस्ट हा जागतिक युवा दिन का साजरा केला जातो हे सांगितले. भारतात तरुण पिढीचे प्रमाण जास्त आहे. तरुण पिढी व ज्येष्ठ यांच्यात दरी कमी झाली पाहिजे. यावर्षी जागृत युवा व जागृत भारत हे अभियान खास राबविले जात आहे. अनेक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वैचारिक पातळीही उंचावली पाहिजे. बेटी बचाव-बेटी पढाव अभियानाचा प्रचार व प्रसार तरुण पिढीनेच केला पाहिजे. मुलगी जन्मल्यानंतर शासनाच्या योजनांची माहिती दिली. ॲड. योजना सावंत यांनी अमली पदार्थ आणि तरुण पिढी या विषयावर मार्गदर्शन केले. ॲड. सावंत म्हणाल्या, एका सर्वेक्षणात 65% तरुण मुले कमी वयातच व्यसनाच्या आहारी गेले आहेत असे समजते, जर असे असेल तर देशाच्या भविष्याचे काय होईल ही चिंता व्यक्त केली. आपल्या देशात काही घातक अमली पदार्थ तस्करी होत आहेत त्यापासून तरुणांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, बळी पडता कामा नये. ॲड. विष्णू पाताडे यांनी रस्ता सुरक्षितता व रहदारीच्या नियमाविषयी विविध उदाहरणासह नागरिक करीत असलेल्या चुका निदर्शनास आणून दिल्या. रस्ता सुरक्षिततेचे नियम आपल्यासाठी आहेत हे सांगताना सर्व नियम व दंड यांचे परिपूर्ण माहिती दिली. तसेच ट्राफिक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन केले
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या, तरुण युवा पिढी ही आपल्या देशाची ओळख आहे. चांगल्या विचारांची, वर्तणुकीची सुरुवात आपल्यापासूनच करावी. समाजामध्ये विधायक व कृतिशील कार्य करण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी तसेच एक संदर्भ साहित्य म्हणून करावा. प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे यांनी या शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम प्रसंगी प्रा. डॉ. सोमनाथ कदम, ॲड. अभिजीत सावंत, राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सौ. व्ही.एस. सावंत, प्रा. एस. एस. ढवळे, दिवाणी न्यायालयातील कर्मचारी उपस्थित होते. मार्गदर्शन शिबिरासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रा.अरुण चव्हाण, सूत्रसंचालन प्रा. विजय सावंत व आभार प्रा. विजयकुमार सावंत यांनी मानले.