वैभववाडी (प्रतिनीधी) : हेत किंजळीचा माळ येथील पुनर्वसन गावठाणाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळ योजनेची पाईप लाईन फुटल्यामुळे गेले आठ दिवस पुनर्वसन गावठाणतील धरणग्रस्तावर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे.ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.पाटबंधारे विभागाला कळवूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप धरणग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे आधीच अनेक समस्यांचा सामना करत असलेले संतप्त धरणग्रस्त आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील आखवणे येथील सुमारे १६२ कुटुंबाचे हेत किंजळीचा माळ येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. याठिकाणी हेत बांबर येथील विहीरीवर नळ योजना करण्यात आली आहे. मात्र वारंवार योजनेत होत असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे नळ योजनेचे पाणी अनियमित येत आहे. तर गेले आठ दिवस नळ योजनेचा पाईप फुटल्यामुळे पुनर्वसन गावठाणाचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. नळ योजनेचे पाईप जमिनीत खोल 5/6 फूट खोल घातलेले असून नेमका पाईप कुठे फुटला आहे. हेच शोधण्याचे काम चालू आहे. त्यामुळे येथील धरणग्रस्तांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. हेत किंजळीचा माळ पुनर्वसन गावठाणाला या नळ योजनेशिवाय दुसरा पाण्याचा स्रोत नाही. शिवाय पुनर्वसन गावठाण उंचावर असल्यामुळे खालून पाणी वरती घेऊन जाणे सुद्धा कठीण आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे. दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर केव्हाही आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सरपंच सुरेश नागप, सुनील नागप, महादेव नागप, श्री.घाग यांनी दिला आहे. चौकट.. अरुणा धरणासाठी आपले घर दार, जमीन जुमला सर्वस्वचा त्याग केला. त्यांच्या त्यागातून तालुक्यातील १७ गाव व राजापूर तालुक्यातील दोन गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणग्रस्तावर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. अशी संतप्त भावना धरणग्रस्त व्यक्त करत आहेत…












